नागपूर महापालिका प्रभाग रचना जाहीर : २०१७ च्या सीमारेषा कायम, काही वस्त्यांच्या नावांमध्ये किरकोळ बदल

0
52
nmc

 

नागपूर २५ : नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शनिवारी प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर करण्यात आले. साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांची ही महत्त्वपूर्ण पहिली पायरी मानली जात आहे.

या नव्या प्रभाग रचनेत २०१७ मधील सीमारेषा तशाच कायम ठेवण्यात आल्या असून केवळ काही वस्त्यांच्या नावांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. प्रभागांची ही रचना २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार करण्यात आली आहे.

भाजप शहराध्यक्ष दया शंकर तिवारी यांचा प्रभाग क्रमांक ११ (बजेरिया) आणि मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांचा प्रभाग क्रमांक १० (दक्षिणामूर्ती) यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या प्रभाग क्रमांक ३५ मध्ये जुन्या पुनर्वसन सीमारेषेचा समावेश करण्यात आला आहे, तर शिवणगावाला प्रभाग क्रमांक ३८ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांचा प्रभाग क्रमांक १७ तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर यांचा प्रभाग क्रमांक २३ हे दोन्ही प्रभाग यापूर्वीप्रमाणेच जुन्याच वस्त्यांसह कायम ठेवण्यात आले आहेत.

या नव्या प्रभाग रचनेनंतर महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही दिवसांत अंतिम अधिसूचना जाहीर होण्याची अपेक्षा आहे.