spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: दोन आरोपींकडून अग्नीशस्त्रे जप्त

नागपूर २८ : गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ च्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. २६ ऑगस्टच्या रात्री ही कारवाई करण्यात आली.

 झांगुरसिंग उर्फ विक्की सरनागतेकडून पिस्तूल जप्त

गुन्हे शाखा युनिट ५ चे अधिकारी व कर्मचारी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, कामठी-खापरखेडा रोडवर एका व्यक्तीजवळ अग्नीशस्त्र असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून झांगुरसिंग उर्फ विक्की सरनागते (वय २७, रा. टेकाडी, जि. नागपूर) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून एक मॅगझीनसह पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 सुमीत सोनवानेकडून पिस्तूल व काडतुसे जप्त

दुसऱ्या एका कारवाईत, भानेगाव चौक, खापरखेडा येथे सापळा रचून सुमीत संजय सोनवाने (वय २९, रा. पवनी, जि. नागपूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याच्या गाडीची व त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळून आली. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतुसे, चारचाकी गाडी आणि मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एकूण जप्ती आणि गुन्हे दाखल

या दोन्ही आरोपींनी कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने ही अग्नीशस्त्रे बाळगली असावीत, असा पोलिसांना संशय आहे. त्यांनी मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात खापरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३/२५ आणि सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण दोन पिस्तूल, सात जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य असा एकूण ४ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी वरिष्ठांच्या  मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस निरीक्षक विजय गिते आणि गणेश कदम यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.पुढील तपास खापरखेडा पोलीस करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.