नागपूर २० : मंगळवारी रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान एक युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे त्याचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर महानगरपालिकेचे पथक रेल्वे स्टेशनसमोरील चहा व पान टपऱ्यांवर अवैध अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करत होते. यावेळी एका टपरीधारकाने कारवाईला विरोध करत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी उपस्थित पोलिस मुख्यालयातील जवानांनी तात्काळ परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तत्परतेने हस्तक्षेप केला. पोलिस कर्मचारी पंकज रामटेके यांनी धाडस दाखवत त्या व्यक्तीला आत्मदहनापासून वाचवले.
यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिस ठाण्यात सुपूर्द केले.
या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या सूज्ञ निर्णयक्षमतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली गेली.
दरम्यान, नागपूर महानगरपालिका शहरात नियमितपणे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा राबवत आहे. या घटनेनंतर आयुक्तांनी पोलिस कर्मचारी पंकज रामटेके यांच्या तत्परता आणि शौर्याचे कौतुक केले.




