– घोटाळ्यात १ हजार विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केल्याचा संशय, लातूरच्या ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक मोटेगावकरांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी
नागपूर :- देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’ या शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सोमवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रा. मोटेगावकर याला नऊ दिवस ‘सीबीआय’ कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले. नीट पेपरफूट घोटाळ्यात किमान एक हजार विद्यार्थ्यांनी हा पेपर खरेदी केल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. नांदेड कनेक्शनमध्ये असलेला नागपूर येथील ‘आलोक’ सीबीआयच्या रडारवर आहे.
नीट पेपरफूट प्रकरणात पुण्यातून तिघांना अटक झाली. रविवारी रात्री १ वाजता लातूरच्या आरसीसी क्लासेसचा प्रमुख प्रा. डॉ. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली. सीबीआयचे मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनात पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी (आयआरएस) यांनी नांदेडात नुकतीच धडक दिली. हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली गेली.
नांदेडच्या विद्युतनगरस्थित अश्विनी कदम या महिलेने आपल्या मुलीसाठी पाच लाखांत पेपर खरेदी केला. त्यासाठी २५ हजार रुपये ऑनलाइन पेमेंट केले गेले. आलोकने त्यांना १५ दिवस पुण्यात थांबवून तेथेच पेपर दिला अशी माहिती आहे.
क्लासेसचे संचालक फरार
नांदेडमध्ये अनेक कोचिंग क्लासेसने सत्र संपल्याच्या नावाखाली कार्यालये बंद केली आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवतीही संशयाचे वलय निर्माण झाले आहे. कोचिंग क्लासेसचे काही संचालक फरार झाले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे. महाविद्यालयाने सोमवारी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले. १६ मेपासून हे निलंबन लागू करण्यात आले आहे. मनीषा मांढरे या २००२ पासून अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवत होत्या.
एनटीए प्रमुखांना समन्स
नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संसदीय स्थायी समितीने एनटीएचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. २१ मे रोजी या विषयावर चर्चा होणार आहे.
कोण आहे नागपूरचा आलोक ?
सीबाआयच्या (CBI) तपासात नागपूरचा ‘आलोक’ नीट पेपरफुटी घोटाळ्यात सीबीआयच्या रडारवर आहे. या प्रकरणाच्या नांदेड कनेक्शनमध्ये त्याचे नाव समोर आले असून, किमान एक हजार विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. सीबीआयच्या तपासात नागपूर येथील ‘आलोक’ या व्यक्तीचे नाव समोर आले असून, तो सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. त्याची सविस्तर माहिती अद्याप मिळालेली नाही.
– फाईल फोटो