– ‘एन.एस.एस.’ तरुणांना योग्य दिशा देणारे प्रभावी माध्यम : डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांचे प्रतिपादन
हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय, लाखनी येथे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) स्थापना दिवस अत्यंत उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. पुण्यशील टेंभुर्णे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. स्वप्निल गाढवे आणि प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मुनेश्वर हलमारे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा. स्वप्निल गाढवे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “२४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेची अधिकृत सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी २४ सप्टेंबर हा दिवस ‘एन.एस.एस. दिवस’ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि निस्वार्थ सेवाभाव रुजवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी’ (Not Me, But You – स्वयं से पहिले आप) हे या योजनेचे ब्रीदवाक्य मानवी मूल्यांची शिकवण देते.”
प्रमुख अतिथी प्रा. मुनेश्वर हलमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “एन.एस.एस.च्या माध्यमातून राबविली जाणारी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान, रस्ते सुरक्षा जनजागृती आणि ग्रामीण भागातील विशेष श्रमसंस्कार शिबिरे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडतात. या सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांमधील संवादकौशल्य व आत्मविश्वास वाढीस लागतो आणि ते एक जबाबदार नागरिक म्हणून घडतात.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “तरुण पिढी हे देशाचे भविष्य असून एन.एस.एस. हे त्यांना समाजविकासाच्या प्रवाहात योग्य दिशा देणारे एक सक्षम माध्यम आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे बोधचिन्ह ओडिशा येथील ऐतिहासिक कोणार्क सूर्यमंदिराच्या रथचक्रावर आधारित असून, ते अविरत गती, प्रगती आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमाचे नेटके व उत्कृष्ट सूत्रसंचालन बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सीमा ठाकरे हिने केले, तर उपस्थितांचे आभार सीमा चोपकर हिने मानले. या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





