कामठी :- पोलीस विभागातील उल्लेखनीय, उत्कृष्ट आणि समर्पित सेवेसाठी नवीन कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर नागपूर विभागीय कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले.
राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. पोलीस सेवेत कर्तव्यनिष्ठा, शिस्त, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे.
यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य डॉ. राजीव पोद्दार, विभागीय आयुक्त राजलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी कुमार अभिषेक, नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) राजेंद्र दाभाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महेश आंधळे यांना मिळालेल्या या गौरवामुळे नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हा सन्मान त्यांच्या सेवाभावी कार्याची आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेची पावती मानली जात आहे.
अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष अजय अग्रवाल, तहसीलदार गणेश जगदाळे, मुख्याधिकारी विनोद जाधव, गटविकास अधिकारी पियुष डोंगरे, दुय्यम पोलीस निरीक्षक परमेश्वर कायदे तसेच जुनी कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी महेश आंधळे यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.








