spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारतीय संस्कृती आणि भाषांचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची गरज –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण हीच खरी राष्ट्रनिर्मिती

मुंबई :- भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्त्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज आहे. भारतीय संस्कृतीने नेहमीच सभ्य, सुसंस्कृत आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी शाळा उभारण्याची आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

घाटकोपर येथील एसपीआरजे कन्याशाळेत आयोजित ‘सुकन्या समृद्धी योजने’अंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार प्रसाद लाड, आ. राम कदम, गौरव भंडारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, बँकांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या शंभर वर्षांत हजारो-लाखो मुलींनी अशा शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतले असून त्या आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. अशा सामाजिक प्रेरणादायी उपक्रमांची परंपरा नसती, तर अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. मुलींच्या मुखातून सादर होणारी संस्कारमूल्यांनी समृद्ध स्तोत्रे ही भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठ परंपरेचे प्रतीक आहे.

भारतीय आणि पाश्चात्य विचारसरणीतील मूलभूत फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, पाश्चात्य विचारसरणी स्पर्धा आणि सामर्थ्याला महत्त्व देते, तर भारतीय संस्कृती प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि प्रगती करण्याचा समान अधिकार मानते. समाजातील सक्षम घटकांनी दुर्बलांसाठी संधी आणि आधारव्यवस्था निर्माण करणे हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे.

ज्या राष्ट्रांनी महिलांना शिक्षण, कौशल्य आणि समान संधी दिली, ती राष्ट्रे प्रगतीच्या शिखरावर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप दिले. जगातील ज्या राष्ट्रांनी महिलांना शिक्षण, कौशल्य आणि समान संधी दिली, ती राष्ट्रेच प्रगतीच्या शिखरावर पोहोचली. भारतीय इतिहासातही महिलांचा सन्मान झाला त्या काळात देश समृद्ध झाला. याच विचारातून केंद्र शासनाने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. ‘सुकन्या समृद्धी योजना’ ही त्यातील अत्यंत महत्त्वाची योजना आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना प्रभावी ठरत आहे. या उपक्रमाअंतर्गत एक हजार मुलींच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २० हजार रुपये जमा करण्यात आले असून पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मुलींना सक्षम करणे ही काळाची गरज

समाजात एक काळ असा होता की मुलींना ओझे समजण्याची चुकीची मानसिकता निर्माण झाली. त्यातून स्त्री भ्रूणहत्येसारख्या गंभीर सामाजिक विकृती वाढल्या आणि त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागले. त्यामुळे मुलींचे संरक्षण, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, शिक्षणाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या प्रत्येक युवक-युवतीने समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात द्यावा. समाजात खऱ्या अर्थाने महान तोच असतो, ज्याच्या मनात देण्याची वृत्ती असते. माणूस संपत्ती नव्हे, तर आपली चांगली कृत्ये मागे ठेवून जातो. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे.

शिक्षण, आर्थिक समावेशन आणि सातत्यपूर्ण पाठबळाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, अशा प्रकारचे उपक्रम राज्य शासनाच्या प्रत्येक मुलीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि सर्वसमावेशक भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांना बळ देणारे आहेत.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव भंडारी यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. एका व्यक्तीच्या दृढ संकल्पातून समाजात किती मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित मुलींच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे अभिनंदन करत, समाजहितासाठी त्यांचे कार्य भविष्यातही अशाच समर्पित भावनेने सुरू राहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

ट्रस्टच्या उपक्रमाअंतर्गत ‘सुकन्या समृद्धी योजने’ अंतर्गत नोंदणी

ट्रस्टच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत दहा वर्षांखालील मुलींची ‘सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत तर दहा वर्षांवरील मुलींची ‘एनपीएस वात्सल्य योजना’ अंतर्गत नोंदणी करण्यात आली. एक हजार खात्यांमध्ये प्रत्येकी २० हजार रुपये जमा करण्यात आले असून पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा केली जाणार आहे.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सुकन्या समृद्धी योजने’ अंतर्गत विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरण करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.