spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नव्या पिढीसाठी आंबेडकरी विचारांची मशाल जिवंत ठेवण्याची गरज – डॉ. रेखा मेश्राम

– नेर येथे दुसरे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन उत्साहात

यवतमाळ :- स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर उभी असलेली आंबेडकरी चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची सशक्त परंपरा आहे. या परंपरेत प्रा. सतेश्वर मोरे यांचे साहित्य व कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे, असे मत दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रेखा मेश्राम यांनी व्यक्त केले. त्या नेर येथे आयोजित संमेलनात अध्यक्षीय भाषण करत होत्या. संमेलनाचे उद्घाटन दलित पँथरचे संस्थापक सदस्य व आंबेडकरी साहित्यिक ज. वी. पवार यांच्या हस्ते झाले.

प्रा. मेश्राम यांनी आपल्या भाषणात तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक, लेखक व कवी प्रा. सतेश्वर मोरे यांच्या स्मृतींनाही त्यांनी आदरांजली वाहिली.

विदर्भात सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक पातळीवर विविध चळवळी समांतरपणे सक्रिय होत्या. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची चळवळ, बहुजनवादी चळवळ, डाव्या विचारसरणीची चळवळ, सत्यशोधक चळवळ तसेच बौद्ध धम्म चळवळ या सर्वांचा समाजावर प्रभाव दिसून येत होता. या चळवळींमध्ये मतभेद असले तरी त्यांचा समान धागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जोडलेला होता, असे त्यांनी नमूद केले.

प्रा. सतेश्वर मोरे हे दलित पँथर चळवळीपासून प्रेरित निष्ठावंत कार्यकर्ते होते. विद्यार्थीदशेपासून त्यांनी आंबेडकरी विचारांशी बांधिलकी ठेवत सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. बडनेरा येथील आर. डी. आय. महाविद्यालयात त्यांनी २५ वर्षे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. तसेच नागपूर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशनचे सहसचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली, अशी माहिती प्रा. मेश्राम यांनी दिली.

साहित्य क्षेत्रात त्यांनी ‘बाई’, ‘शंबूक’, ‘मी मांग नाही’ आणि ‘स्वातंत्र्य एक प्रश्नचिन्ह’ यांसारखी पथनाट्ये तसेच सामाजिक प्रश्नांवर आधारित अनेक कविता लिहिल्या. ‘मेजर’, ‘दंगल’, ‘नातं पावसाचं नि माझं’, ‘माझं पहाडपण’ आणि ‘शिकारी पाखरं आणि माझी पावलं’ या कवितांमधून त्यांनी आंबेडकरी साहित्याला नवे परिमाण दिले, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. मोरे यांनी हजाराहून अधिक व्याख्यानांमधून सामाजिक प्रश्नांवर परखड भूमिका मांडली. अन्याय आणि चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध त्यांनी नेहमीच ठामपणे आवाज उठविला. त्यांच्या लेखनात सामाजिक परिवर्तनाची ज्वाला स्पष्टपणे दिसून येते, असे मेश्राम म्हणाल्या.

यावेळी विदर्भातील महिलांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेत समाजपरिवर्तनाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. तुळसा बनसोडे, जाई चौधरी, अंजना देशभ्रतार, सुलोचना डोंगरे, रत्नकला मकेसर यांसारख्या महिलांनी समाजजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य केले, असेही त्यांनी नमूद केले. प्रा. सतेश्वर मोरे यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या साहित्याचे संकलन व प्रकाशन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता मोरे व महादेव घरडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. जगदीश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समता सैनिक दलातर्फे अध्यक्ष, उद्घाटक व उपस्थित मान्यवरांना सलामी देण्यात आली. वनिता बहुउद्देशीय ग्राम उद्योग महिला मंडळ, प्रज्ञाशोध आंबेडकरी विचार मंच आणि प्रज्ञाशोध सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. शरद मोरे, महादेव घरडे, ऋषभ मेश्राम, आदेश पाटील, अनुप भिमटे, पपीता पाटील, जोशना खडसे, रेखा इंगोले यांनी परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.