Home Latest News शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, सामाजिक सलोखा धोक्यात : शरद पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, सामाजिक सलोखा धोक्यात : शरद पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका

0
68

 

नाशिक :- राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढवला. शेती, परराष्ट्र धोरण आणि आरक्षण या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका—हे शेजारी देश भारतासोबत उभे नाहीत. बांगलादेशालाही आपण स्वातंत्र्य मिळवून दिले होते, तरी तो आज आपल्यापासून दूर आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे प्रत्येक वस्तूवर कर लावण्याची होती. अशा पार्श्वभूमीवर मोदींनी परराष्ट्र धोरणाबाबत गंभीर विचार करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर, पण सरकार उदासीन

पवार म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. “शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, कांदा निर्यातीवर निर्बंध आहेत. नाशिक जिल्हा बँक प्रचंड थकबाकीत आहे. शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत असून, त्यांची संघटना अधिक प्रभावी करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

नाशिक हा आधुनिक शेतीतील प्रयोगशील जिल्हा असून, शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनाची सुरुवातही इथूनच झाली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली. मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या तणावावर बोलताना पवार म्हणाले, “महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे. हैदराबाद गॅझेटमधील तरतुदींमुळे बंजारा समाजासारख्या इतर समाजांना आदिवासी दर्जा मागण्याची प्रेरणा मिळाली असून, यामुळे समाजात कटुता वाढू शकते.”

राज्य सरकारने नेमलेल्या आरक्षण समित्यांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “सरकारच्या समित्या कधीही एका समाजापुरत्याच नसाव्यात. मात्र ओबीसी समितीला चंद्रशेखर बावनकुळे आणि मराठा समितीला मराठा समाजाचेच नेते नियुक्त केले आहेत. ही चुकीची पद्धत आहे,” अशी टीका त्यांनी केली.

गांधी-नेहरू विचारधारेवर चालणारा पक्ष

पवारांनी नाशिकचा गौरवशाली इतिहासही कार्यकर्त्यांना आठवून दिला. “आपला पक्ष गांधी-नेहरू विचारधारेवर चालणारा आहे. महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरूंची वर्किंग कमिटी बैठक नाशिकमध्येच झाली होती. तसेच महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता देण्याचे श्रेयही नाशिकला आहे,” असे ते म्हणाले.

“भारत-चीन युद्धकाळात पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री केले. त्यांनी पदाची शपथ घेताच चीनने सैन्य मागे घेतले. ते नाशिक जिल्ह्यातून बिनविरोध खासदार म्हणून निवडून गेले होते,” अशी ऐतिहासिक आठवणही त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.