– ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला भीषण अपघात; चालक फरार
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा शहरात आज सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली. ज्या दुचाकीने कामाचा व्याप सुसह्य होईल असे वाटले होते, तीच दुचाकी चालवताना काळाने एका कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यावर झडप घातली. अवघ्या १० दिवसांपूर्वीच नवीन मोटारसायकल घेणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याचा आयशर ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडले गेल्याने हा भीषण अपघात घडला.
शंकर भोजलाल पटले (४५, रा. ओमनगर, गोंड टोली, कोकरला, भंडारा) असे मृत वृत्तपत्र विक्रेत्याचे नाव आहे. शंकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भंडारा शहरात वृत्तपत्र वाटपाचे काम करत होते. कामात सुलभता यावी यासाठी त्यांनी मोठ्या हौसेने अवघ्या १० दिवसांपूर्वीच नवीन मोटारसायकल खरेदी केली होती. मात्र, या नवीन गाडीवरचा त्यांचा प्रवास अखेरचा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर पटले हे आज सकाळी ७:३० ते ८:०० वाजेच्या सुमारास आपले दैनंदिन काम आटोपून नवीन मोटारसायकलने घराकडे परतत होते. विद्यानगर परिसरातील एमएसईबी (MSEB) कार्यालयासमोर आणि चोले हॉस्पिटलजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, नागपूरकडून येणाऱ्या एका भरधाव आयशर ट्रकच्या चालकाने पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या ओव्हरटेकिंगच्या प्रयत्नात ट्रकची धडक शंकर यांच्या दुचाकीला लागली.
ही धडक इतकी भीषण होती की, शंकर हे दुचाकीवरून खाली कोसळले आणि थेट ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. ट्रकचे जड चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला. अपघातानंतर माणुसकीला काळिमा फासत ट्रक चालक घटनास्थळावरून ट्रकसह पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अवघ्या १० दिवसांपूर्वीच घरात आलेल्या नवीन गाडीचा आनंद साजरा करण्यापूर्वीच कर्त्या पुरुषाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पटले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फरार ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भंडारा शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.




