नागपूर :- नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, अनेक ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. बुधवारी नागपूरचे कमाल तापमान तब्बल ४६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. कडक उन्हाचा तडाखा, उष्ण वारे आणि दुपारच्या वेळी निर्माण होणारी प्रचंड उकाड्याची परिस्थिती यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत असून, नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे लागत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २५ मेपासून “नव ताप्या” ला सुरुवात होणार असून, ही उष्णतेची तीव्र लाट २ जूनपर्यंतकायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या काळात भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे, दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे आणि लहान मुले, वृद्ध तसेच आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लोकमान्यतेनुसार “नव ताप्या”च्या दिवसांत गोरगरिबांना पाणी, ताक, फळे किंवा अन्नदान केल्यास पुण्य लाभते, असे मानले जाते. त्यामुळे अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून पाणपोई, शरबत वाटप आणि सेवा उपक्रम राबविले जात आहेत.



