खापा, वार्ताहर :- खापा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) किशोर भुजाडे यांची बुटीबोरी पोलीस ठाण्यात बदली झाली असून त्यांच्या जागी गोंदिया येथून पोलीस निरीक्षक (पीआय) चंद्रकांत काळे यांनी गुरुवारी खापा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
नवीन ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी पदभार स्वीकारताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बदली झालेल्या एपीआय किशोर भुजाडे यांना खापा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्यावतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
एपीआय किशोर भुजाडे यांनी आपल्या कार्यकाळात खापा शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य देत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले.
दरम्यान, नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्यासमोर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई सुरू ठेवण्याचे आव्हान असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




