अमरावती :- युवा कर्तृत्व फाऊंडेशन, मानव चेतना जनविकास बहुउद्देशीय संस्था आणि समृद्धी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लक्षवेध कर्तृत्व गौरव संमेलन – अमरावती २०२६’मध्ये एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
अमरावती येथील गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात २३ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यास पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. रवींद्र कोल्हे अध्यक्षस्थानी होते. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार तसेच सामाजिक कार्यकर्ते रविकुमार गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल निलेश काळे यांचा गौरव करण्यात आला. एडुसन फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, कौशल्यविकासाला चालना देणे तसेच गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे.
या संमेलनात सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्ते, समाजसेवक आणि कर्तृत्ववान व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या कार्याची समाजासमोर ओळख निर्माण करणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश होता. मान्यवरांची उपस्थिती आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या गौरवामुळे ‘लक्षवेध कर्तृत्व गौरव संमेलन –अमरावती २०२६’ प्रेरणादायी ठरले.








