भंडारा :- अंगणवाडी केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना गरम व ताजा आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटांना सध्याचा आहाराचा दर परवडत नसल्याने आहार पुरवठा संघटना, भंडारा यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडीतील लाभार्थ्यांना आहार पुरविण्यासाठी सध्या प्रति लाभार्थी केवळ रुपये ८ इतका दर मिळत आहे. मात्र, वाढती महागाई, धान्य, डाळी, भाजीपाला, खाद्यतेल, मसाले, गॅस व इंधन तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती यामुळे या दरामध्ये दर्जेदार व पौष्टिक आहार पुरविणे बचत गटांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे संघटनेने सांगितले.
बचत गटांच्या महिलांकडून स्वतःच्या आर्थिक क्षमतेतून खर्च करून आहार पुरवठ्याचे काम सुरू ठेवले जात आहे. त्यातच आहार पुरवठ्याचे बिल वेळेवर मिळत नसल्यामुळे बचत गटांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
१. आहाराचा दर रुपये ८ वरून रुपये २० प्रति लाभार्थी करण्यात यावा.
२. आहार पुरवठा करणाऱ्या बचत गटांचे बिल प्रत्येक महिन्याला नियमितपणे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे.
३. वाढत्या महागाईचा विचार करून आहाराच्या दराचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.
या मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला बचत गट हे शासनाच्या योजनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांना अल्प दरामध्ये आहार पुरवठा करणे आर्थिकदृष्ट्या दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे शासनाने आहाराचा दर वाढवून किमान रुपये २० प्रति लाभार्थी करावा आणि आहाराचे बिल दर महिन्याला नियमितपणे बचत गटांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी करण्यात आली.
सदर मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडे सादर करण्यात आले असून, शासन व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहार पुरवठा संघटना, भंडारा यांनी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे जिल्हामार्गदर्शक नरेंद्र रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष निशा सोनकुसरे,विद्या थोटे ,उमेश्वरी मेश्राम,मोनाली रोकडे,आर.जे.पठाण,ज्योती भानारकर,उमा चटप,भावना चौधरी,उषा निमजे,रंजना कुंभारे,शोभा राऊत,आर.डी.पाठक सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.





