spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘मुंबई’ वरून विरोधकांनी राजकीय पोळी भाजू नये – राम नाईक

मुंबई :- ‘‘केंद्रिय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा गैरलाभ घेऊन विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये, ‘बॉम्बे’ ‘बम्बई’ चे ‘मुंबई’ करण्यामागच्या आमच्या यशस्वी प्रयत्नांनी इतिहास घडविला आहे’’ अशा शब्दात ‘बॉम्बे’ ‘बम्बई’ चे ‘मुंबई’ करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी या संपूर्ण प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्रिय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी मुंबईच्या इतिहासाची पूर्ण माहिती नसल्याने ‘आयआयटी’ च्या नावातील ‘बॉम्बे’ ची भलामण केली असली, तरी वस्तुस्थिती समजल्यावर ते नक्कीच आपले विधान मागे घेतील, असा विश्वास राम नाईक यांनी व्यक्त केला. “मात्र संपूर्ण इतिहास माहीत असलेल्या विरोधकांनी त्यावरून टीकेची झोड उठवून ‘मुंबई’ चे श्रेय उपटण्याचा आता 30 वर्षांनी प्रयत्न करू नये”, असा स्पष्ट ईशाराही राम नाईक यांनी यावेळी दिला. राम नाईक यांच्या सहा वर्षांच्या अविरत प्रयत्नांनंतर केंद्र सरकारने ‘बॉम्बे’ ‘बम्बई’ ऐवजी सर्व भाषांत ‘मुंबई’ हेच नाव वापरण्याचा अध्यादेश 15 डिसेंबर 1995 रोजी जारी केला होता.

या ऐतिहासिक कामाची माहिती देताना राम नाईक म्हणाले, “मी 1989 मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्याचा मसूदा तपासणीसाठी माझ्याकडे आला. हिंदी मसुद्यात माझे नाव होते राम नायक (उत्तर बम्बई), तर इंग्रजीत Ram Naik (North Bombay). मी लोकसभा अध्यक्षांना तात्काळ पत्र लिहीले व असे असता कामा नये; सर्वच भाषात माझे नाव राम नाईक (उत्तर मुंबई) असे लिहीले पाहीजे असे सुचविले. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष रविराय यांच्याशी चर्चा झाली. विशेष नाव सर्व भाषांमध्ये सारखेच असले पाहिजे, त्यांचे भाषांतर होऊ शकत नाही, हे माझे म्हणणे तत्वतः बरोबर आहे व निदान लोकसभेच्या कामकाजात तरी यापुढे सर्व भाषेत ‘मुंबई’ असेच लिहीले जाईल असा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला. इथून मग बॉम्बे, बम्बईचे मुंबई व्हावे यासाठीच्या प्रयत्नांची खरी सुरुवात झाली. सर्व संबंधितांना पत्रे लिहीली, लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. अखेर गाडी अडली ती तांत्रिक मुद्यावर. गावाचे किंवा शहराचे नाव बदलायचे तर त्याचा अधिकार महसूली नियमाप्रमाणे राज्यसरकारचा असतो. यासाठी राज्यसरकारकडून प्रस्ताव मंजूर होऊन मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे यावा लागतो. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे राज्य आल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मी ही माहिती दिली. त्यांच्या मंत्री मंडळाने एकमताने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविलाही पण पुन्हा गाडी अडली. तत्कालीन काँग्रेस सरकारने हा प्रस्ताव काहीही कारवाई न करता बासनात गुंडाळून ठेवला. मग पुन्हा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर 15 डिसेंबर, 1995 रोजी केंद्रानेही बॉम्बे, बम्बई ऐवजी मुंबई हेच नाव वापरावे असा अध्यादेश जारी केला. अर्थात यातही एक छोटी चूक झाली. हिंदीत ‘मुंबई’ शब्द ‘मुम्बई’ असा लिहीला गेला. पुढे 1999 मध्ये मी स्वतः केंद्रात राज्यमंत्री असताना जेव्हां माझ्याकडे गृहखात्याचाही अतिरिक्त भार दिला गेला तेव्हां या संदर्भातील अंतिम सुधारीत आदेश 28 मे, 1999 रोजी काढून ‘मुंबई’ हेच नाव सर्व भाषांत केले. वर्षानुवर्षे पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राची अस्मिता राखण्याचा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला लाभले, बॉम्बे, बम्बईचे मुंबई झाले. बॉम्बे, बम्बईचे मुंबई झाल्यानंतर मद्रासचे चेन्नई, कलकत्त्याचे कोलकाता, बंगलोरचे बंगलूरु, त्रिवेंदमचे तिरुअनंतपुरम् अशी अनेक मुळची नावे सरकारमान्य झाली, सर्वत्र वापरली जाऊ लागली.”

त्यानंतर उत्तर प्रदेशचा राज्यपाल असताना राम नाईक यांच्या आदेशानेच ‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ व ‘फैजाबाद’ चे ‘अयोध्या’ झाले. स्वतः आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीही ‘इंडिया’ ऐवजी आवर्जून ‘भारत’ म्हणताना आपण पाहतो, याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना या संदर्भात लिहिलेले पत्रही यावेळी नाईक यांनी माहितीसाठी दिले.

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना राम नाईक यांनी या संदर्भात लिहिलेले पत्र पीडीएफ स्वरुपात जोडत आहोत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.