मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा आणि समर्पण या भावनेतून देशभर ‘सेवा पंधरवडा’ च्या माध्यमातून साजरा करत आहोत. सेवा करणे हा भारतीय जनता पार्टीचा धर्म आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून प्रदेश भाजपा सर्व घटकांसाठी लोकसहभागातून सामाजिक उपक्रम राबवत आहे. तर दुसरीकडे उबाठा गट मात्र मेवा खाण्यात मग्न आहे. जनतेलाही सेवा कोण करते आणि मेवा कोण खाते हे माहिती झाले आहे, अशी बोचरी टीका भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी केली. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामना अग्रलेखातून मोदींनी संधी गमावली अशी टीका केल्यानंतर बन यांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत म्हटले की, मोदींनी इतिहास घडवला पण संधी खरेतर उद्धव ठाकरेंनी गमावली. मोदीनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण केलं, 370 कलम हटवले, देशाला नवा विकास व प्रगतीचा मार्ग दाखवला. पण उबाठांनी मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात काहीच केले नाही. त्यामुळे इतिहास पंतप्रधान मोदींना युगपुरुष म्हणून ओळखेल आणि उद्धव ठाकरे ना ‘घरबकोंबडा मुख्यमंत्री’ म्हणून ओळखेल अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
फोडाफोडी काँग्रेसची नीती- समाजजोडणी फडणवीसांची नीती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाजांमध्ये भांडणे लावतात हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप हास्यास्पद असल्याची टीका बन यांनी केली. फडणवीस यांनी समाज जोडला तर दुसरीकडे काँग्रेसने नेहमीच समाजात फोडाफोडी करून दुही माजवली. जातीवरून भांडणे काँग्रेसने लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व समाज, जाती यांना एकत्र आणत त्यांच्या उन्नतीसाठी काम केले म्हणूनच जनतेने त्यांना तीनदा मुख्यमंत्रीपदी विराजमान केले .
मीना ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना गजाआड केले जाईल
आम्हा सर्व मराठी जनतेच्या मीना ठाकरे आदर्श आहेत, त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय सरकार राहणार नाही. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस निश्चितच कारवाई करतील असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.
‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी जवानांचे अभिनंदनाचे चित्र राज ठाकरेंनी काढायला हवे होते
राज ठाकरे यांनी भारत-पाक सामन्यावर व्यंगचित्र काढले, त्यावर टीकेची झोड उठवत बन म्हणाले की राज ठाकरे व्यंगचित्र काढतात, ती त्यांची शैली आहे. मात्र भारत-पाक क्रिकेटवर व्यंगचित्र काढण्याऐवजी, आपल्या जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला तेव्हा जवानांचे अभिनंदन करणारे चित्र त्यांनी काढायला हवे होते. पण ते राज यांनी केले नाही. त्यामुळे जनता सत्य काय आहे ते जाणते.
देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वास जनतेच्या विश्वासावर: रोहित पवारांचा आधार फक्त दीड हजार मते
रोहित पवारांचा आत्मविश्वास फक्त दीड हजार मतांचा आहे आणि अजितदादांच्या आशीर्वादावर उभा आहे. फडणवीसांचा आत्मविश्वास मात्र जनतेच्या आशीर्वादावर उभा आहे. त्यामुळेच सलग तीनदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे रडण्याचे काम तुम्ही करत आहात, आणि येणाऱ्या सर्व महापालिकांमध्ये महायुतीचा विजय निश्चित आहे.
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस सोनियाचा दिवस, काँग्रेसने लादलेली आणीबाणी हा काळा दिवस
बन यांनी प्रणीती शिंदे यांनी मोदींचा वाढदिवस काळा दिवस या केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस काळा नव्हे तर सुवर्ण दिवस आहे. काळा दिवस म्हणजे काँग्रेसचा इतिहास, काळा दिवस हा आणीबाणीचा होता. मोदीच्या नेतृत्वात देशाने जगात नाव कमावले आहे. देश विकासाची नवी शिखरे सर करत आहे. मोदीना 140 कोटी जनतेचा आशीर्वाद लाभल्यामुळे आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे असेही त्यांनी नमूद केले.




