spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आमचे नंदापुरी हे गाव मौदा तालुक्यातच हवे !

– गाव रामटेक तालुक्यात नको; मौदा तालुक्यातच ठेवावे

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नंदापुरी (ता. मौदा) येथील समस्त ग्रामस्थांनी आपल्या गावाचे रामटेक तालुक्यात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवित, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी निवेदन दिले आहे. नंदापुरी गावाला मौदा तालुक्यातून वगळून रामटेक तालुक्यात समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. तसेच या संदर्भात मौदा येथील तहसीलदार यांनी १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ग्रामस्थांचा हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकत्रितपणे नोंदविलेल्या हरकतीत म्हटले आहे की, “आमचे नंदापुरी हे गाव पूर्वीप्रमाणे मौदा तालुक्यातच ठेवावे. मौदा तालुक्याशी आमचा दैनंदिन संपर्क, व्यवहार व सुविधा सुरळीत आहेत. कोणताही गैरसोयीचा प्रश्न नाही.” ग्रामस्थांनी स्पष्ट केले की नंदापुरी गाव नागपूर मेट्रो रिजन (एनएमआरडीए) क्षेत्रात समाविष्ट असल्याने शेतीची सरकारी किंमत अधिक, तसेच घरकुल योजनेतील २.५ लाख रुपयांचा लाभ मिळतो. परंतु रामटेक तालुक्यात गेल्यास हा लाभ केवळ १.५ लाख रुपयांवर येईल, ज्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, रामटेक तालुक्यात समावेश झाला तर आमच्या विकास योजनांवर थेट परिणाम होईल. म्हणून हा निर्णय रद्द करून नंदापुरी गावाला मूळप्रमाणे मौदा तालुक्यातच कायम ठेवावे.

नंदापुरी गावाचा मौदा तालुक्याशी अनेक वर्षांचा अतूट संबंध आहे. आमचा दैनंदिन संपर्क, शासकीय व्यवहार व सुविधा मौद्यातच सुरळीत मिळतात. रामटेक तालुक्यात समावेश झाल्यास एनएमआरडीए क्षेत्रातील आर्थिक लाभ, शेतीची उच्च किंमत आणि विविध विकास योजनांवरील हक्क कमी होतील. आमच्या गावाचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून मौदा तालुक्यातच कायम ठेवावे.

– लक्ष्मीकांत चाफले, ग्रामस्थ नंदापुरी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.