खापा, वार्ताहर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १६ सप्टेंबर रोजी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील कुस्तीपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या स्पर्धेत पीएमश्री न.प. राजेंद्र हायस्कूल, खापाच्या कुस्ती संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्पर्धेची दारे खुली केली. शाळेच्या मल्लांनी ताकद, चपळाई आणि कुस्तीतील डावपेचांचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत विविध वजनगटांत यश संपादन केले.

१४ वर्षे वयोगटातील ६२ किलो वजनगटात नव्या विनोद खुबाळकर, १७ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजनगटात धनश्री रवींद्र बावणे, तर १९ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजनगटात जयेश प्रमोद बावनकुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तसेच १७ वर्षे वयोगटातील ८० किलो वजनगटात दुर्गेश अशोक पराते, ५७ किलो वजनगटात दिया प्रकाश डंभारे, ४८ किलो वजनगटात वेदांत तानाजी खोरगडे आणि ५५ किलो वजनगटात रोशन संतोष परतेकी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
या सर्व विजयी खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, पीएमश्री न.प. राजेंद्र हायस्कूलचे खेळाडू दरवर्षी स्पर्धांमध्ये सहभागी होत असून, यंदाही मल्लांनी आपल्या कामगिरीची परंपरा कायम राखली आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल नगर परिषद खापाचे मुख्याधिकारी सचिन राऊत, नगराध्यक्ष पियुष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, शिक्षण सभापती अंजली मेनकुदळे, मुख्याध्यापक सुनील नेहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद सोनकुसळे, उपाध्यक्ष सौ. माधुरी बोंदरे, नगरसेवक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाने अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक शामराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू नियमित सराव करीत आहेत. सहाय्यक क्रीडा शिक्षक सुनील गाडीगोने, सुनील भांगरे, प्रमोद बावनकुळे, असलम खान, प्रवीण मेश्राम, नीता चामाटे, भाग्यश्री सांडे, सोनाली माडेकर, नम्रता मडके, विजय बठ्ठे, सुनील हेडाऊ, अनिल टेकाडे, श्रीकृष्ण मौंदेकर व दिलीप रंभाड यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. विभागीय स्पर्धेतही राजेंद्र हायस्कूलचे मल्ल चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.





