Home Blog Page 15

गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी बालसुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करा – महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

मुंबई :- गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी बालकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने दिल्या आहेत. काळाचौकी येथे बालिकेच्या विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ८ पोलीस महानिरीक्षक कार्यालये आणि १२ पोलीस आयुक्तालयांतील अधिकाऱ्यांची अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेत ऑनलाइन सुनावणी नुकतीच घेण्यात आली. त्यादरम्यान त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काळजी व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या सुनावणीत आयोगाच्या सदस्यांसह संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते. बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित वातावरणासाठी पोलीस, स्थानिक प्रशासन, गणेश मंडळे, बाल संरक्षण यंत्रणा व प्रसारमाध्यमांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन आयोगाने केले.

गर्दी होणाऱ्या गणेश मंडळांमध्ये विशेष बाल पोलीस, महिला पोलीस व दामिनी पथक तैनात करणे, सीसीटीव्ही व देखरेख व्यवस्था प्रभावी ठेवणे, तसेच ॲम्ब्युलन्स, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सावली व सुरक्षित प्रतीक्षास्थळांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

उत्सवस्थळी बालकांचा भिक्षावृत्ती व बालमजुरीसाठी वापर होऊ नये यासाठी विशेष मोहीम राबवून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच आगामी दुर्गोत्सव ‘बालस्नेही’ करण्यासाठी आतापासूनच पोलीस प्रशासन व मंडळांनी नियोजन करावे, असे निर्देशही देण्यात आले.

थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृतीला गती द्यावी  – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा

मुंबई :- थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि समुपदेशनावर अधिक भर देण्यात यावा. थॅलेसेमियाबाबत समाजातील विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य भवन, येथे बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त १ ते ८ मे २०२६ या कालावधीत ‘संकल्प सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून व्यापक लोकसहभाग निर्माण करून थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली. पुढील काळातही अभियान अधिक प्रभावीपणे राबवून थॅलेसेमियाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्तविकार असून, त्याच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य समुपदेशन महत्वाचे आहे. नागरिक, विद्यार्थी, गर्भवती महिला तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये थॅलेसेमियाबाबत आवश्यक माहिती पोहोचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करावेत.

थॅलेसेमिया मायनर असलेल्या व्यक्तींमध्ये आजाराची तीव्र लक्षणे दिसून येतीलच असे नाही. मात्र, दोन थॅलेसेमिया मायनर व्यक्तींच्या विवाहामुळे त्यांच्या अपत्याला थॅलेसेमिया होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे विवाहपूर्व तपासणी, समुपदेशन आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांना विशेष महत्त्व आहे. या दृष्टीने थॅलेसेमिया तपासणी, एचपीएलसी/इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी, रक्तदान शिबिरे, गर्भवती महिलांचे समुपदेशन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले.

थॅलेसेमियाचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून या आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. थॅलेसेमिया रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी व समुपदेशन करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

बैठकीस आयुक्त संजय काटकर, आयुक्त (शहरी) डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव राजश्री सारंग, राज्य समन्वयक लक्ष्मीकांत पिंपळगांवकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे समन्वयक चेतन भोजकर उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व मंडळांचे उपसंचालक सहभागी झाले होते.

संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी टप्पानिहाय कृती आराखडे तयार करा – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :- संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच पशुधनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. टंचाईग्रस्त गावांसाठी उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, पर्यायी स्रोतांची उपलब्धता आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा याबाबत टप्पानिहाय कृती आराखडे तयार करून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

एल-निनोच्या हवामान परिस्थितीमुळे भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणी टंचाई विचारात घेऊन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन नैनुटिया तसेच वरिष्ठ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पाणी पुरवठा मंत्री पाटील म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता असलेली गावे निश्चित करून तेथील उपलब्ध जलस्रोत, विहिरींमधून पाणीपुरवठा, तात्पुरत्या नळयोजना, विंधन विहिरी, टँकरची आवश्यकता तसेच टँकर भरणा केंद्रांची माहिती कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात यावीत. सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक जलस्रोतांचा वापर, त्यानंतर पर्यायी स्रोतांमधून पाणीपुरवठा आणि आवश्यकता भासल्यास टँकरद्वारे पुरवठा, अशा क्रमाने उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात यावे.

मुख्य अभियंता तसेच जिल्हानिहाय उपअभियंते यांच्यामार्फत टंचाईग्रस्त गावनिहाय करण्याचे निर्देश देत, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार स्तरावर प्रभावी समन्वय राखण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सध्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये 479 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांत टँकरच्या संख्येत 71 ने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य तीव्र टंचाई असलेल्या तालुक्यांमध्ये आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ आणि पर्यायी जलस्रोत यांचे आगाऊ नियोजन करण्यावर भर दयावा असे मंत्री पाटील यांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यांकडून सादर करण्यात आलेल्या विशेष कृती आराखड्यांसाठी सुमारे 291.42 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता असून पूरक मागणीद्वारे निधी उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही करावी आणि नियमित टंचाई निवारण उपाययोजनांसाठीही आवश्यक निधीचे स्वतंत्र नियोजन करण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी केल्या.

सिद्धेश्वर नगर -रमाबाई नगर क्लस्टरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

· मुंबई-‘एमएमआर’मध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार

· ‘क्लस्टर’ केवळ इमारतींचा नाही; ६ हजार कुटुंबांना हक्काचे घर

· सुविधा आणि रोजगार देत नव्या ठाण्याची उभारणी करण्याचा निर्धार

ठाणे :- मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मुंबई ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टरला चालना देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर आणि रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

ठाण्यातील ६ हजार कुटुंबांना सुरक्षित, दर्जेदार घरे देतानाच २३ नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून नव्या ठाण्याचा पाया रचण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सुमारे २० हेक्टर अर्थात ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या या क्लस्टरमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.

निवासी इमारती नव्हे, तर मोठे रस्ते, मुबलक पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, गार्डन, मैदान, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा विकास होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचा संदर्भ देत शिंदे यांनी क्लस्टरचा प्रवास २० वर्षांच्या संघर्षातून पुढे आल्याचे सांगितले. किसनगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह अनेक दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषण, मोर्चे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टर प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी नमूद केले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्लस्टरमध्ये निवासी बांधकामासोबत कमर्शियल विकास आणि स्थानिक रोजगार निर्माण करण्यावर शिंदे यांनी भर दिला. “घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे,” या ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेतून स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर तलाव परिसराचे पुनर्विकासासोबत स्वच्छता व सुशोभीकरण होऊन तलावाला मोकळा श्वास मिळेल, असेही ते म्हणाले.

रहिवाशांच्या मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत त्यांनी दिले. “दोन पैसे कमी नफा झाला तरी चालेल; नागरिकांच्या घरांच्या दर्जात कपात करू नका,” अशी स्पष्ट सूचना विकासकांना करताना सरकार आणि महापालिकेकडून आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यासारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचे सांगत, क्लस्टरमधील इमारतीही दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आयकॉनिक इमारतींसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद असल्याचेही त्यांनी सांगितले.

“क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे; चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान,” हा संदेश देत शिंदे यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या ओळींचा दाखला दिला. अखेरीस विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देतानाच चांगल्या सुविधांसोबत मोठा टीव्हीही भेट म्हणून द्यावा, अशी मिश्कील सूचनाही त्यांनी केली.

या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. माधव कुसेकर, प्रशांत रोडे, सभागृह नेते हनुमान जगदाळे, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण,शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक नारायण पवार, राम रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम, संजय वाघुले यांच्यासह ठाण्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर!

– पिकांचे सरसकट नुकसान; मदतही सरसकट देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद

• शेतकऱ्यांना थेट मदत देण्यासाठी गतीने पावले उचलण्यास सुरुवात

• संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही; शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार

लातूर :- मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, येथील नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसत असून, राज्य शासनही शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याला लातूर येथून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या प्रसंगी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार बसवराज पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता १९७२ पेक्षाही अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने गतीने पावले उचलली आहेत. लवकरच दुष्काळाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांचे सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे कृषिपंप वीज बिल यापूर्वीच माफ केले असून, यापुढेही त्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवून शेतकऱ्यांना शासनाने दिलासा दिला असून, या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संकटकाळात सर्वतोपरी मदत करणार

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना अन्नधान्यासह आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जलसंधारणाची आणि रोजगार निर्मितीची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येतील. या संकटात राज्य शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. पुढचे काही महिने अतिशय आव्हानात्मक असून या काळात धीर सोडू नका; संकटाचा सामना आपण सर्वजण एकजुटीने करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याला हुंदका अनावर; मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

निलंगा तालुक्यातील जाऊ येथे मुख्यमंत्र्यांना पीक नुकसानीची माहिती देताना नूर पटेल हे शेतकरी भावूक झाले. वाळलेली पिके पाहून त्यांना हुंदका अनावर झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हात हातात घेऊन, “घाबरू नका, राज्य शासन या संकटात पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल, असा धीर देत दिलासा दिला. तसेच या ठिकाणी उपस्थित महिला शेतकऱ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

‘स्वरार्जुन’मधून उलगडणार महाभारताचा सांगीतिक प्रवास

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘स्वरार्जुन’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे.

‘स्वरार्जुन’ हा एक सांगीतिक महाभारत प्रवास असून, गीत, संगीत आणि कथा यांचा सुरेख संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे. महाभारतातील विविध प्रसंग, व्यक्तिरेखा आणि प्रेरणादायी जीवनमूल्ये संगीत व कथनाच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमात संगीत – माधुरी नाईक, निवेदन – श्रीराम केळकर आणि कवी – श्रीरंग (श्रीपाद सहस्त्रबुद्धे) यांचा सहभाग आहे. सोमेश नार्वेकर, केतकी चैतन्य आणि धनंजय म्हसकर हे गायक कलाकार सादरीकरण करणार आहेत.

वाद्यवृंदामध्ये तबला – अमेय ठाकूरदेसाई, पखवाज – हनुमंत रावडे, तालवाद्य – गंधर्व पाटील व संतोष पेडेकर, बासरी – विजय तांबे, सतार – पंडित उमाशंकर शुक्ल, की-बोर्ड – झंकार कानडे व अक्षय कावळे यांचा सहभाग आहे. संकल्पना व निर्मिती – वैभव केळकर व डॉ. मेघना दलाल असून, संगीत संयोजन – सोमेश नार्वेकर व अमेय ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय संस्कृती, साहित्य, संगीत आणि कलापरंपरेतील समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘स्वरार्जुन’ या गीत, संगीत आणि कथनाच्या माध्यमातून साकारलेल्या महाभारताच्या प्रेरणादायी सांगीतिक प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

गणेश मंडप बनले लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचे व्यासपीठ

– ‘लोकसंवाद 2026’च्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती,पात्रता व अर्ज प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन

मुंबई :- गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा सुंदर संगम साधत माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद 2026’ या अभिनव उपक्रमाला मुंबई उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश मंडळांना भेट देण्यासाठी परिसरातील नागरिकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन गणेश मंडपांचे रूपांतर लोककल्याणकारी योजनांच्या माहितीच्या व्यासपीठात करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश दर्शनासोबतच नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे.

या उपक्रमात केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, योजनेसाठी पात्रता काय, अर्ज कुठे व कसा करायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, संबंधित शासकीय कार्यालय कोणते आणि उपलब्ध सुविधांचा लाभ कसा घ्यायचा, याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शासकीय योजना आणि नागरिक यांच्यातील माहितीची दरी कमी करण्यास मदत होत आहे.

युवक, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवा-सुविधांची माहितीही यावेळी देण्यात आली. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन करून उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

नागरिकांशी थेट संवाद

‘लोकसंवाद 2026’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत सोबत समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि महसूल विभागाने समन्वयाने सहभाग घेतला. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध गणेश मंडळांना भेटी देत उपक्रमाचे समन्वयन केले.

यावेळी ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये, तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश अपंडकर यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्या सहकार्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘लोकसंवाद 2026’ उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवातील लोकसहभागाचा सकारात्मक उपयोग करून शासनाच्या योजना, सेवा आणि सुविधांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

गणेश मंडळांचाही उत्स्फूर्त सहभाग

‘लोकसंवाद 2026’मध्ये सहभागी झालेल्या मंडळांमध्ये इंदिरानगरचा राजा-महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आशापुरा, वांद्रे पूर्व याचे अध्यक्ष अरुण देवेंद्र, खजिनदार मंगेश कोणार आणि सचिव विनय कडतल; शास्त्रीनगरचा राजा-शास्त्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शास्त्रीनगर, वांद्रे पूर्व याचे अध्यक्ष संतोष गाडे, खजिनदार सुदर्शन कोंडा आणि सचिव बाबू वेमुला; तसेच सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व यांचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष निलेश जाधव, सरचिटणीस एकनाथ जाधव, खजिनदार दशरथ नाईक आणि सहखजिनदार रत्ना नाईक यांनी सहभाग नोंदविला.

गणेशोत्सवातील भक्तीच्या वातावरणाला लोककल्याणकारी योजनांच्या जनजागृतीची जोड देत ‘लोकसंवाद 2026’ने गणेश मंडपांना संवाद, माहिती आणि मार्गदर्शनाची केंद्रे बनविले आहे.

महाराष्ट्राच्या लोककला आणि श्रीगणेश भक्तीने लखनऊ दुमदुमले….

· ‘लोककलेतील श्रीगणेश’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध…

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या सहकार्याने लखनऊ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत भव्य, प्रभावी आणि दर्जेदार सादरीकरण झाले. महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा, संगीत, नृत्य आणि श्रीगणेश भक्तीच्या विविध रंगछटांनी सजलेल्या या कार्यक्रमातून लखनऊच्या रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अनुभव मिळाला.

राय उमनाथ बली प्रेक्षागृह, कैसरबाग, लखनऊ येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेश विधान परिषदेचे आमदार पवन सिंह चौहान, भातखंडे संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. मांडवी सिंह, निखिलेश लखनवी, बिरजू महाराज कथक संस्थान, लखनऊच्या अध्यक्षा श्रीमती कुमकुम घर, उपाध्यक्षा श्रीमती निखिलेश तिवारी, उत्तर प्रदेश सांस्कृतिक विभागाचे माजी कार्यक्रम कार्यकारी अधिकारी कमलेश पाठक तसेच संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष अच्चेलाल सोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित रसिक प्रेक्षकांनी महाराष्ट्राच्या लोककलांचे उत्कृष्ट आणि प्रभावी सादरीकरणाची प्रशंसा केली. आणि.कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड आशीष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची लोककला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचेही उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

लोककलांच्या विविध रंगछटांनी सजलेला मंच

‘लोककलेतील श्रीगणेश’ या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध पारंपरिक लोककलांचे अत्यंत सुंदर आणि प्रभावी सादरीकरण करण्यात आले. गणेशवंदना, नमन, ओवी, मंगळागौर, गोंधळ, बाल्या नृत्य, गौरी-गणपतीवरील हिंदी रचना व भजन, संगीतमय नृत्यनाट्य तसेच वाद्यवृंदाच्या साथीने सादर करण्यात आलेला श्रीगणेश नृत्यकलाविष्कार अशा विविध सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट नृत्य कलाविष्कारातून, अभिनयातून, पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा लखनऊच्या मंचावर जिवंत केली.

यावर्षी गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती महाराष्ट्राच्या सीमांपलीकडे देशाच्या विविध भागांत सादर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

याच संकल्पनेतून ‘लोककलेतील श्रीगणेश’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे देशातील विविध राज्यांमध्ये सादरीकरण करण्यात येत आहे.

महाराष्ट्राची ओळख केवळ त्याच्या इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवामुळेच नव्हे, तर त्याच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरांमुळेही आहे. महाराष्ट्राच्या या अमूल्य सांस्कृतिक वारशाची देशभरातील रसिकांना ओळख करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

देशाच्या विविध भागांत राहणाऱ्या कला आणि संस्कृतीप्रेमींना महाराष्ट्राच्या लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव देण्याबरोबरच विविध राज्यांतील कलाकार आणि रसिक यांच्यात सांस्कृतिक संवाद व आदान-प्रदानाला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीकडे हस्तांतरण करण्याबरोबरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशभर व्यापक स्वरूपात पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून केले जात आहे.

या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वय श्रीकृष्ण कला फाऊंडेशन यांनी केले. फाऊंडेशनच्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट कलाविष्कारातून महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्ध परंपरा लखनऊच्या मंचावर प्रभावीपणे सादर केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लखनऊ येथील कमलेश पाठक, दुर्गेश पाठक आणि आशुतोष पाठक यांचे प्रत्यक्ष सहकार्य आणि महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

लखनऊच्या रसिक प्रेक्षकांनी ज्या आत्मीयतेने आणि उत्साहाने महाराष्ट्राच्या लोककलांचे स्वागत केले, त्यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक मैत्री आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला आणखी बळ मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.

महाराष्ट्राची लोककला, श्रीगणेश भक्ती आणि लोकपरंपरेचा हा सांस्कृतिक जागर देशभर निरंतर पोहोचत राहावा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळावी, या भावनेतून ‘लोककलेतील श्रीगणेश’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम लखनऊ येथे अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच

लातूर :- शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दुष्काळाच्या अनुषंगाने करावयाच्या आवश्यक त्या उपयोजनांबाबत शासनस्तरावर योग्य कार्यवाही सुरू आहे. तसेच दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासन करत आहे. सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभही देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तेवढा ‍निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

एशियन गेम्स: भारतीय बेटियों ने क्रिकेट में जीता गोल्ड

0

– फाइनल में श्रीलंका को 147 रन से हराया, भारत ने 216 रन बनाए

नई दिल्ली :- भारतीय महिला क्रिकेट टीम ने एशियन गेम्स 2026 में स्वर्ण पदक जीतकर भारत का गोल्ड खाता खोल दिया। फाइनल में भारत ने श्रीलंका को 147 रन से हराकर लगातार दूसरी बार महिला क्रिकेट का स्वर्ण पदक अपने नाम किया। इससे पहले भारतीय टीम ने 2023 हांगझोउ एशियन गेम्स में भी स्वर्ण पदक जीता था।

फाइनल मुकाबले में भारत ने पहले बल्लेबाजी करते हुए 20 ओवर में तीन विकेट पर 216 रन का विशाल स्कोर खड़ा किया। 217 रन के लक्ष्य का पीछा करने उतरी श्रीलंकाई टीम भारतीय गेंदबाजों के सामने टिक नहीं सकी और 15.4 ओवर में महज 69 रन पर ऑलआउट हो गई। भारतीय गेंदबाजों ने नियमित अंतराल पर विकेट लेकर श्रीलंका को संभलने का कोई मौका नहीं दिया।

एशियन गेम्स में यह भारतीय महिला क्रिकेट टीम का लगातार दूसरा स्वर्ण पदक है। 2023 में हांगझोउ में स्वर्ण जीतने के बाद टीम ने 2026 में भी अपना खिताब बरकरार रखा। इस जीत के साथ एशियन गेम्स 2026 में भारत के कुल पदकों की संख्या सात हो गई है।

श्रीलंका के खिलाफ जीत का सिलसिला जारी:

श्रीलंका के खिलाफ इस जीत के साथ भारत ने टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट में लगातार आठवीं जीत दर्ज की। यह श्रीलंका के खिलाफ भारतीय महिला टीम की लगातार जीत की सबसे लंबी श्रृंखला है। इससे पहले भारत ने 2018 में लगातार सात टी-20 अंतरराष्ट्रीय मैच जीते थे।

श्रीलंका ने भारत को आखिरी बार 2024 महिला एशिया कप के फाइनल में हराया था। इसके बाद दोनों टीमों के बीच हुए आठ टी-20 अंतरराष्ट्रीय मुकाबलों में भारत ने लगातार जीत दर्ज की है। 2026 एशिया कप के फाइनल में भी भारत ने श्रीलंका को 72 रन से हराया था। अब एशियन गेम्स के फाइनल में मिली जीत के साथ भारत ने इस सिलसिले को आठ मैचों तक पहुंचा दिया है।