Home Blog Page 14

खापा–सावनेर व खापा–पाटणसावंगी रेल्वे क्रॉसिंगवर ROB उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

0

– गती शक्ती युनिटकडून प्रस्तावित प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात; शहरवासीयांच्या अनेक वर्षांच्या मागणीला मिळाली चालना

खापा, वार्ताहर :- खापा शहरातून सावनेर तसेच पाटणसावंगीच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे ये-जा करताना फाटक बंद राहिल्यामुळे नागरिक व वाहनचालकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांचा वेळ वाया जात असून, आपातकालीन सेवांनाही विलंबाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल (ROB) उभारण्यात यावा, अशी खापावासीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीला आता प्रत्यक्ष कार्यवाहीची दिशा मिळाली असून प्रस्तावित ROB प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

खापा नगराध्यक्ष पियूष राजेंद्र बुरडे यांनी शहरवासीयांची ही मागणी संबंधित वरिष्ठ स्तरावर मांडत सातत्याने पाठपुरावा केला. आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख, आमदार डॉ. राजीव पोतदार तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या महत्त्वपूर्ण मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला.

या पाठपुराव्यानंतर रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रस्तावासंदर्भात पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. सावनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांकडून प्राप्त पत्रानुसार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), नागपूर विभागांतर्गत गती शक्ती युनिटमार्फत प्रस्तावित प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

ROB उभारणीमुळे रेल्वे फाटक बंद असताना निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता असून, वाहनचालक व नागरिकांचा वेळ वाचण्याबरोबरच रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना सुरळीत मार्ग उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीकडे खापा शहरासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्वेक्षणानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना गती मिळण्याची अपेक्षा असून, ROB उभारणीमुळे खापा शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा होण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांच्या मागणीला मिळाली चालना

“खापा शहरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्ष कार्यवाहीच्या दिशेने जात असल्याचे समाधान आहे. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी सहकार्य करणारे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख, आमदार डॉ. राजीव पोतदार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार,” असे नगराध्यक्ष पियूष राजेंद्र बुरडे यांनी सांगितले.

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार

0

नागपूर :- मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्या अधिपत्याखालील चंद्रपूर येथील कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी गट -ब या पदाची ४ पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. यासाठी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. सविस्तर माहितीसाठी www.gmcchandrapur.org या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. मिलिंद कांबळे यांनी केले आहे.

नागपूरच्या रोहिणी रामटेकेंची इस्तंबूलमध्ये सुवर्ण कामगिरी

0

– Women’s Equipped Bench Press Championship 2026 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व; ४० लिफ्टर्सच्या स्पर्धेत सुवर्णपदक

नागपूर :- नागपूरच्या पॉवरलिफ्टर रोहिणी रामटेकेंनी तुर्कियेतील इस्तंबूल येथे झालेल्या Women’s Equipped Bench Press Championship 2026 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. विविध देशांतील सुमारे ४० लिफ्टर्स सहभागी असलेल्या या स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचा तिरंगा अभिमानाने फडकावला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत गेल्या तीन वर्षांपासून त्या नियमित पॉवरलिफ्टिंगचा सराव करीत आहेत. नागपुरातील G99 Gym ॲन्ड स्पोर्ट ॲकडमी तसेच पुणे येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षक ज्योती भादेकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. रोहिणी यांनी आपल्या यशाचे श्रेय आई पुष्पमाला पाटील, पती सुहास रामटेकें व मुलगा चैतन्य रामटेकेंच्या पाठिंब्याला दिले. तसेच प्रशिक्षक ज्योती भादेकर, आर्यन म्हस्के, गिरीश बिंजाडे आणि संपूर्ण टीमचे आभार मानले. या आंतरराष्ट्रीय यशासाठी Good Earth AgroChem Pvt. Ltd. (GoodEarth Group) यांच्या Sports CSR Programme अंतर्गत मिळालेल्या प्रायोजकत्वाचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी आणि क्रीडा यांचा समतोल साधत मिळविलेले रोहिणी यांचे हे यश नागपूरसह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे

बाप्पांच्या पर्यावरणपूरक निरोपासाठी नागपूर महानगरपालिकेची जय्यत तयारी

0

– महापौर निता ठाकरे यांनी केली व्यवस्थेची पाहणी

– शहरात ४४७ कृत्रिम विसर्जन कुंड, एक हजार कर्मचारी कर्तव्यावर

नागपूर :- मागील दहा ते बारा दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! च्या गजरात निरोप घेणार आहेत. महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ.विपीन, वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांच्यासह इतर सर्व झोन सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात बाप्पांच्या पर्यावरणपूरक निरोपासाठी मनपाने जय्यत तयारी केली आहे.

नागपूर महानगरपालिका द्वारा नागरिकांच्या सोयीसाठी सक्करदरा तलाव , गांधीसागर तलाव, पोलीस लाईन टाकळी, कोराडी तलाव, सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा, नाईक तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्थेची महापौर निता ठाकरे यांनी बुधवारी (ता.२३) पाहणी केली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित, वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, नेहरूनगर झोन सभापती  सीमा ढोमणे, धंतोली झोनच्या सभापती भारती बुंदे, एआयएमआयएमचे गटनेता शकील पटेल, नगरसेवक शैलेश पांडे, नगरसेवक प्रमोदसिंह ठाकूर, नगरसेविका  वर्षा डोंगरे, नगरसेविका रेखा निमजे, नगरसेवक शेषराव गोतमारे, मनपाचे उपायुक्त राजेश भगत, मुख्य कार्यकारी अभियंता लिना उपाध्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अधिक्षक अभियंता विजय गुरुबक्षाणी, नेहरूनगर झोन सहाय्यक आयुक्त विकास रायबोले, सहाय्यक आयुक्त अशोक घराटे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी  नरेद्र बहिरवार, कार्यकारी अभियंता राजेश राठोड, नेहरूनगर झोन आरोग्य अधिकारी आनंद खोडसकर, मकरंद संगमवार यांच्यासह मनपाचे कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान महापौर निता ठाकरे यांनी विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना कसलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले, तसेच विसर्जन स्थळी बॅरीगेटिंग करण्यात यावी, ठीकठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, विद्युत प्रकाश व्यवस्था उत्तम राखावी, विहिरींच्या पाण्याची व्यवस्था ठेवावी, जलतरणपटू यांची नेमणूक करण्यात यावी आदी निर्देश दिले. तर आयुक्त डॉ. विपीन यांनी विसर्जन स्थळावर उपद्रव शोध पथकाचे जवान व पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या.

नागपूर शहरात यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक व सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. शहराच्या जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी तब्बल २२५ ठिकाणी एकूण ४४७ कृत्रिम विसर्जन कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. नवव्या दिवसीय श्रीगणेश मूर्तींचे विसर्जनासाठी मनपाद्वारे ४९ ठिकाणी तयार करण्यात आलेल्या १३७ कृत्रिम तलावांमध्ये २ हजार २८६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, यात २ हजार १२४ मातीच्या व १६२ पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

मोठ्या व लहान मूर्तींसाठी विशेष व्यवस्था

शहरात आगमन झालेल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन सुलभ व पर्यावरणाला हानी न पोहोचवता व्हावे, यासाठी मनपाने चोख व्यवस्था केली आहे. यात मोठ्या आकाराच्या गणेशाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, कच्छीविसा आणि कोराडी येथील विशेष मोठे तलाव सज्ज आहेत. याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी शहरात २२ फिरत्या मोबाईल कुंडची (Mobile Tanks) व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कृत्रिम तलावांची माहिती आता एका क्लिकवर

नागरिकांना आपल्या घराच्या जवळ कोणता कृत्रिम तलाव किंवा विसर्जन स्थळ आहे, याची माहिती शोधण्यासाठी कुठेही भटकण्याची गरज भासणार नाही. यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष संकेतस्थळ https://ganpati-zone-map.emergent.host आणि क्यूआर कोड तयार केला आहे. हा क्यूआर कोड नागरिकांनी आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यास, त्यांना आपल्या घराजवळ असलेल्या झोननिहाय कृत्रिम तलावांची सविस्तर माहिती मिळवता येईल. तसेच, त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी गुगल मॅपचे दिशादर्शक नेव्हिगेशन देखील उपलब्ध राहणार आहे. हा क्यूआर कोड मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निर्माल्यापासून होणार खतनिर्मिती १८ निर्माल्य रथांची सेवा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून बाप्पाच्या विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्माल्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये एकूण १८ निर्माल्य रथ सेवा देणार आहेत. या निर्माल्य रथांद्वारे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्री गणेशाचे निर्माल्य श्रद्धापूर्वक संकलित केले जात आहे. संकलित केलेले हे संपूर्ण निर्माल्य भांडेवाडी येथील प्रकल्पात नेऊन त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल व त्यापासून खत तयार केले जाईल.

निर्माल्य रथासाठी टोल फ्री नंबर

निर्माल्य रथा संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांसाठी मनपाने 1800 2677 966 हा टोल फ्री लोकांसाठी उपलब्ध केला आहे.

१ हजार कर्मचारी कर्तव्यावर

शहरात चोख स्वच्छता राखण्यासाठी दहाही झोनमध्ये एक हजार स्वच्छता कर्मचारी युद्धपातळीवर तैनात करण्यात आले आहेत, नागपूरकरांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून नागपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Major boost to ‘Aatmanirbhar Bharat’: MoD signs Rs 811 crore contract with BDL for 160 Satellite Smart Anti Airfield Weapons for IAF

0

Nagpur :- Ministry of Defence has inked a contract with Bharat Dynamics Limited (BDL) for the procurement of 160 Satellite Smart Anti Airfield Weapons (SAT-SAAW) along with associated equipment for Indian Air Force (IAF) with a total cost of Rs 810.79 crore under Buy (Indian – Indigenously Designed, Developed and Manufactured) category. The contract was signed in the presence of Defence Secretary Shri Rajesh Kumar Singh in New Delhi on September 23, 2026.

SAT-SAAW is an air-to-ground precision guided glide bomb which can be launched from platforms like Jaguar, Hawk & Su-30 MKI, and has the capability to neutralise enemy airfields from a long stand-off range. Indigenously designed and developed by DRDO, the system will have an indigenous content of 60% along with indigenous of sub-systems like Initial Measurement Unit, Long Impact Delay Fuse and Twin Store Carrier to further boost Aatmanirbharta in defence.

The delivery of SAT-SAAW is scheduled between 2027-2028 and 2028-2029. Its induction would certainly enhance the operational capability of IAF to continue their unhindered operations and strengthen defence preparedness of the country.

प्रहार मिलिटरी स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या हँडबॉल संघाचे दिमाखदार यश

0

– जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम क्रमांक; सर्व खेळाडूंची विभागीय स्तरासाठी निवड

नागपूर :- सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी संचालित प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर, नागपूर येथील १७ वर्षांखालील मुलींच्या हँडबॉल संघाने जिल्हा क्रीडा संघटनेच्या हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाचा मान मिळविला. यशवंत स्टेडियम, धंतोली, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रहार मिलिटरी स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. स्पर्धेदरम्यान प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुलींनी आक्रमक खेळा सोबतच बचावाचेही उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी परस्परांमध्ये उत्तम समन्वय राखत संघभावनेचे दर्शन घडविले. निर्णायक क्षणी दाखविलेली चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळे संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विजेत्या संघातील सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामागे संघाचे प्रशिक्षक ओमप्रकाश शहू यांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध प्रशिक्षण तसेच खेळाडूंची मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती, तांत्रिक कौशल्य आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळ करण्यावर देण्यात आलेल्या भरामुळे संघाला हे यश मिळाले.

चार खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रहार मिलिटरी स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. शाळेतील नक्ष वैद्य, सार्थक खडसकर, हार्दिक परिहार आणि तितीक्षा माहुरे या चार खेळाडूंची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेला आणि खेळाडूंच्या मेहनतीला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. विजेत्या संघात अन्वी पुंडे, प्रज्ञा मडावी, श्रेया भैसारे, रसिका तेलसमारे, तितीक्षा माहुरे, ऋतुजा डोरले, शिक्षा गोहरे, लावण्या मेश्राम, मनस्वीनी हरडे, निर्मयी सहारे, तेजस्विनी भगत, तमन्ना शेंदरे, आरुषी माहुरे, आर्या चांभारे आणि रिद्धी सातपुते यांचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ. वंदना कुलकर्णी तसेच शिक्षकवृंद उपस्थीत होते.

विधान परिषद पदवीधर निवडणूक तयारीबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक

0

नागपूरl :- आगामी नागपूर विधान परिषद निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी घेतलेल्या बैठकीत आदर्श आचारसंहिता, निवडणूक कार्यक्रम यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी रचना इंदूरकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. निवडणूक कार्यक्रमाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत संबंधित सहाही जिल्ह्यांमध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पार पाडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे.

कर्जमाफीनंतर सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांसाठी भरीव पॅकेज

0

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची माहिती

मुंबई :- निलंगा, तुळजापूर आणि सोलापूरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधून स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दुष्काळात जास्तीतजास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, दिलासा कसा देता येईल याचा आढावा घेणार आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीनंतर येत्या काळात मदतीचे भरीव पॅकेज सरकारकडून निश्चितपणे दिले जाईल, अशी माहिती भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी दिली.

जनाब संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर बोलण्याचे कारणच नाही, असे सांगून बन म्हणाले की त्यांचा स्वतःचा निवडणुकीवर विश्वास नाही. केरळ, कर्नाटकमध्ये काँग्रेस निवडणूक जिंकले की ईव्हीएम, निवडणूकव्यवस्था, एसआयआर चांगले. पण पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात भाजपा जिंकली की मग मात्र निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली जाते. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापूर्वी आपल्या पक्षप्रमुखावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे की, आपले पक्षप्रमुख झोपा का काढतात? आपले पक्षप्रमुख घराबाहेर का जात नाहीत? निवडून आलेले 6 खासदार तुम्हाला वैतागून सोडून जातात त्याला निवडणूक आयोग काय करू शकतो? तुम्हाला तुमचे खासदार, आमदार सांभाळता येत नाहीत. तुम्हाला फक्त मातोश्रीत आणि भांडुपच्या गाढव नाक्यावर बसून राहा.

अमित शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यापेक्षा संजय राऊत, महाराष्ट्रातल्या जनतेने तुमचा पक्ष बडतर्फ केलाय, तुमच्या पक्षाला घरी बसवले ते पहा. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना लोकांनी निवडून दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पाठीशी जनतेचे आशीर्वाद आहेत. लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. संजय राऊतांच्या सांगण्यावरून बडतर्फ करायला गेले तर संजय राऊत भाजपाच्या सगळ्या खासदारांना आणि भाजपाच्या सगळ्या सरकारला बडतर्फ करण्याची मागणी करतील. ज्यांचा पक्ष जनतेने बडतर्फ करून टाकलाय त्यांनी इतरांना बडतर्फ करण्याची मागणी करू नये, असे बन यांनी सुनावले.

एसआयआरमध्ये 13 कोटी मतदारांची नावे कापली गेल्याचे काही पुरावे संजय राऊतांकडे असतील तर त्यांनी ते पुरावे द्यावेत. एसआयआरची प्रक्रिया करताना तुमचे बूथ प्रमुख, तुमचे बीएलए नव्हते, तुमचे कार्यकर्ते नव्हते. उबाठा गट आणि महाविकास आघाडीकडे कार्यकर्तेच नसल्याने ते एसआयआरच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले नाहीत. ज्यांचे नाव मतदार यादीत असेल त्या सगळ्यांना मतदानाचा हक्क मिळतो. अजूनही महाराष्ट्रात एसआयआरमध्ये कुणाचे नाव कापले गेले असेल, त्यांना पुन्हा नाव टाकता येते. त्यासाठी फॉर्म भरता येतो. कुठेही एसआयआरच्या प्रक्रियेत चुक झाली असेल तर निवडणूक आयोगाकडे दाद मागता येते. एसआयआरमधून बांगलादेशी घुसखोर हद्दपार झाल्याने संजय राऊत यांना पोटदुखी होते. बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर महाविकास आघाडीला जिंकायचे होते, असा आरोप बन यांनी केला.

अमित शाह कुठेही गायब झाले नाहीत. देशाचे नेतृत्व करण्यासाठी ते सक्षम आहेत. उद्धव ठाकरे गायब आहेत आणि दिशा सालियन प्रकरण आल्यानंतर आदित्य ठाकरे कुठे गायब आहेत, ते संजय राऊतांनी सांगितले पाहिजे. अमित शाह 370 कलम हटवले, सक्षमपणे नक्षलवादमुक्त देश करण्याचे काम अमित शाह नी केले तर महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना निवडणुकीमध्ये गायब केले. आधी आपले नेते गायब झाले त्याचा विचार करावा, असा टोला बन यांनी लगावला.

चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज मेळावा २७ सप्टेंबरला

0

– केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सौजन्याने ४०० गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

नागपूर :- केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या सौजन्याने त्यांच्या मातोश्री स्व. श्रीमती भानुताई गडकरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील १७ वर्षांपासून चर्मकार सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. यंदाही इयत्ता दहावी व बारावीमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या नागपूर शहर व ग्रामीण भागातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा भव्य सत्कार व समाज मेळावा रविवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात, महाल, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १,५०० रुपये प्रोत्साहनपर बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार प्रवीण दटके, मोहन मते, नरेंद्र भोंडेकर, डॉ. परिणय फुके, महापौर निता ठाकरे, माजी आमदार संदीप जोशी, अनिल सोले, डॉ. उपेंद्र कोठेकर, दयाशंकर तिवारी, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर, उपमहापौर लिला हाथीबेड, नगरसेवक व शहर महामंत्री रितेश गावंडे, योगेश पाचपोर, भैय्यासाहेब बिघाणे, श्रीराम मांडस्कर व डॉ. राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच समाज बांधव- भगिनींनी या सामाजिक व शैक्षणिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चर्मकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

एमपीएससी आंदोलनाला लागलेल्या राजकीय वळणापासून दूर राहा

0

– भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई :- गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हातात राहिले नसून त्याला आता राजकीय वळण लागल्याने त्यात अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात एमपीएससीमध्ये विक्रमी भरती करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चुकीच्या मागण्या आणि दिशाभूल करणाऱ्या राजकारण्यांपासून दूर राहण्याचे आवाहन भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंदोलकांच्या बहुतांशी मागण्या मान्य झाल्या आहेत. पण आता चुकीच्या आणि असंवैधानिक मागण्या केल्या जात आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवायचे असेल तर ते अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींकडेच असल्याचा स्पष्ट उल्लेख घटनेतील कलम 317 मध्ये आहे. असे असताना अशी चुकीची मागणी का केली जाते आहे असा प्रश्न पडू लागला आहे. कारण सुरुवातीच्या 12 पैकी 11 मागण्या ऐकायला मुख्यमंत्री तयार आहेत. तुमची बारावी मागणी का पूर्ण होणार नाही? कारण ती असंवैधानिक आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबवले पाहिजे. आता विद्यार्थ्यांच्या भावनेवर खेळायला सुरुवात झाली आहे. दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. बरेचसे विद्यार्थी हे दुष्काळी भागातून आहेत. त्यांच्या जखमेवर बोट ठेवून राजकीय पोळी भाजली जात असल्याचे चित्र आता दिसत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करायची आपण संधी दिली पाहिजे. त्यांची दिशाभूल करत राजकीय स्वार्थ पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे आहे, असे आ. पाचपुते यांनी नमूद केले.

यावेळी आ. पाचपुते यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली 4 सप्टेंबरला स्थापन झालेल्या समितीचा दौराही सुरू आहे. या समित्या काही ठिकाणी आठ आठ तास विद्यार्थ्यांशी चर्चा करत आहेत. 1100 विद्यार्थी अथवा त्यांच्या शिष्टमंडळांचे थेट म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने समिती काम करत आहे तर जी काही शंका, आक्षेप असेल तर आंदोलकांनी समितीकडे ते दिले पाहिजेत. कालच्या आंदोलनात तर काँग्रेसचे युवक अध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी होणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सीजेपीचेही आंदोलन सुरु असून सरकारविरोधात आंदोलन असल्याचे चित्र उभे करण्यात येत असल्याचा आरोप आ. पाचपुते यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका ही ऐकण्याची आहे आणि ऐकून निर्णय घेण्याची आहे. एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की एखादा निर्णय घ्यायची अथवा चौकशी लावायची वेळ आली तर आपल्या सरकारची बदनामी झाली तरी चालेल. पण विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ देणार नाही. इतकी ठोस आणि कठोर भूमिका घेण्याची मानसिकता मुख्यमंत्र्यांची आहे तर हा विषय चर्चेने मार्ग सोडवला पाहिजे, अशी अपेक्षा आ. पाचपुते यांनी व्यक्त केली.

पुण्यात आंदोलन करण्यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेण्यात आली. पुण्यात गणेशविसर्जन 48 तास चालते हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे 26 सप्टेंबरला आंदोलन करण्याची परवानगी मागितली गेली. विसर्जनाला पोलीस 48 तास बंदोबस्तात असतात. पुढचे एक – दोन दिवस ते आंदोलनाला परवानगी देऊ शकणार नाहीत ही जाणीव असल्यानेच जाणीवपूर्वक 26 तारखेची मागणी केली गेली. राजकीय नाट्य घडवण्यासाठीच हे सारे सुरु आहे. थोडक्यात सरकार आमच्या आम्हाला आंदोलन करून देत नाही हे चित्र तयार करायचा रोहित पवार यांचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी थांबवणे गरजेचे आहे, असल्याचे मत आ. पाचपुते यांनी व्यक्त केले.