Home Latest News पलाडी गावच्या जनआंदोलनाला मोठे यश; २० कोटींचा अंडरपास मंजूर! 

पलाडी गावच्या जनआंदोलनाला मोठे यश; २० कोटींचा अंडरपास मंजूर! 

0
39

हंसराज भंडारा :- भंडारा ते सिंगोरी या सहापदरी महामार्गामुळे पलाडी गावाचा बंद झालेला मार्ग अखेर मोकळा होणार आहे. राष्ट्रीय किसान मोर्चा, सामाजिक कार्यकर्ते ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय डी. रंगारी आणि पलाडी ग्रामस्थांच्या तीव्र जनआंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली असून, या ठिकाणी अंडरपास आणि जोडरस्त्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भंडारा बायपासच्या सहापदरीकरणामुळे पलाडी गावात जाण्यासाठी असलेला जुना मार्ग बंद झाला होता. विशेषतः लाखनीकडून येणाऱ्या वाहनांना गावात प्रवेश करण्यासाठी २ ते ३ किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत होता. पलाडी परिसरात आरटीओ कार्यालय, मेडिकल कॉलेज, ईव्हीएम स्ट्रॉंग रूम आणि कोका अभयारण्याकडे जाणारा मार्ग असल्याने येथे मोठी रहदारी असते. अंडरपास नसल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागत होता, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती.

या गंभीर समस्येकडे ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय रंगारी यांनी सातत्याने प्रसारमाध्यमांतून आणि प्रत्यक्ष निवेदनांद्वारे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले. २० मे २०२५ पासून विविध वृत्तपत्रांतून या अन्यायाला वाचा फोडण्यात आली. तसेच राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि खासदारांना निवेदने देण्यात आली, तसेच १० जून रोजी आमदारांना घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला होता.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले ) जिल्हा शाखेने सुद्धा या बाबत अवगत केले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामी, लोकभावनेचा आदर करत केंद्र सरकारने २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून आता पलाडी गावाजवळ भव्य अंडरपास आणि सुरक्षित जोडरस्ता निर्माण केला जाईल.

या यशामुळे पलाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी अभय रंगारी, राष्ट्रीय किसान मोर्चा आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.