पांढरकवडा :- राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ करिता उपजिल्हा रुग्णालय पांढरकवड्याची निवड करण्यात आलेली असून दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली सातुरवार व शारदा चांदेकर अधिपरिचारिका यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार सोहळ्यास आरोग्य विभागाचे प्रधान सचिव २ ई. रविंद्रन, डॉ. कादंबरी बालकवडे अभियान संचालक तथा आयुक्त, डॉ. नितीन अंबाडेकर संचालक, मुंबई, डॉ. विजय कांदेवाड संचालक, पुणे यांची उपस्थिती होती. सदर पुरस्काराचे मूल्यांकन एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये रुग्णालयाने बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, मोठ्या व लहान शस्त्रक्रिया, स्वाभाविक प्रसूती, सिझीरियन प्रसूती, तसेच अन्य आरोग्य सेवांमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे करण्यात आलेले आहे. डिजिटल अहवाल प्रणालीतील अचूकता, सेवा गुणवत्तेची सातत्यपूर्ण जपणूक आणि रुग्णसेवेतील तत्परता या सर्व बाबींमध्ये उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडाने १८.२ गुणांसह महाराष्ट्रतून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील आरोग्य संस्थांचे राज्यस्तरीय मूल्यमापन करून पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. रुग्णालयाच्या या यशामागे डॉ. सुशील वाघचौरे उपसंचालक, आरोग्य सेवा,अकोला मंडळ, यवतमाळचे जिल्हा शल्य चिकित्सक सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडण यांचे मार्गदर्शन व रुग्णालयाच्या कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षिका डॉ वैशाली सातुरवार यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, इतर सर्व कर्मचारी यांचे परिश्रम यांचा मोलाचा वाटा आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल रुग्णालयाचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.
पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा महाआरोग्य सन्मान व आरोग्यरत्न पुरस्कार देऊन गौरव


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



