पांढरकवडा :- पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या एका वादग्रस्त कर्मचाऱ्यांवर ठाणेदारांची असीम कृपा असल्याची चर्चा सध्या शहरात सर्वत्र सुरू आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्याची बदली होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला असतानाही, तो अजूनही त्याच ठाण्यात कार्यरत असून वरिष्ठांकडून त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मागील दोन महिन्यांपासून बदली असूनही कायम मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याची शासकीय नियमानुसार काही महिन्यांपूर्वीच अन्यत्र बदली झाली होती. मात्र, ठाणेदारांच्या मेहरबानीमुळे हा कर्मचारी अद्यापही पांढरकवडा ठाण्यातच पाय रोहून बसला आहे. या प्रकाराबाबत स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दोन ते तीन वेळा सविस्तर बातम्या प्रकाशित होऊनसुद्धा वरिष्ठ पातळीवरून यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का?’ असा सवाल सुजाण नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
“मला कोणी हलवू शकत नाही” कर्मचाऱ्याची अरेरावी
वरिष्ठांच्या या संशयास्पद मूकसंमतीमुळे संबंधित कर्मचाऱ्याचे मनोधैर्य इतके वाढले आहे की, तो उघडपणे अरेरावी करत फिरत असल्याची चर्चा आहे. “माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही आणि या ठाण्यातून मला कोणीही हलवू शकत नाही,” असे सांगत हा कर्मचारी सर्रासपणे सर्व नियम व वरिष्ठांच्या आदेशांना धाब्यावर बसवत असल्याचे बोलले जात आहे.
टॉवरवरील हायव्होल्टेज ड्रामा आणि याच कर्मचाऱ्याचे नाव
काही दिवसांपूर्वी शहरात एक खळबजनक घटना घडली होती. शैलेश नावाचा एक तरुण मोबाईल टॉवरवर चढून एका वादग्रस्त विषयावरून थेट याच सचिन नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावाने टाहो फोडत होता. या घटनेमुळे परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. अखेर स्थानिक पत्रकारांनी दाखवलेल्या संयम व तत्परतेमुळे, शैलेशला विश्वासात घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रात्री उशिरा तो तरुण पत्रकारांच्या मध्यस्थीने टॉवरवरून खाली उतरला. या संपूर्ण संवेदनशील आणि गंभीर प्रकरणाच्या केंद्रस्थानीही हाच वादग्रस्त पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले होते, ज्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वरिष्ठांचे मौन गूढ
एकापाठोपाठ एक वाद समोर येत असताना आणि मीडियामध्ये बातम्या झळकत असतानाही, या पोलीस कर्मचाऱ्याला पाठिशी घातले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आता या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात आणि या ‘मेहरबान’ कर्मचाऱ्यावर व ठाणेदारांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण पांढरकवडा तालुक्याचे लक्ष लागून आहे.





