spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सिंदेवाही स्थानकावर प्रवाशांचा तीव्र आक्रोश

– ६ ते ८ तास रखडलेल्या पॅसेंजर ट्रेनमुळे प्रवासी हैराण; लेखी तक्रारीनंतर गाड्या रवाना

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी इनसाइडर न्युज टुडे 

नवेगावबांध :- गोंदिया-बल्लारशा आणि बल्लारशा-गोंदिया मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांच्या अनिश्चित आणि तासनतास होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. २२ ऑगस्ट रोजी गोंदिया-बल्लारशा (ट्रेन क्र. ६८८१५) आणि बल्लारशा-गोंदिया (ट्रेन क्र. ६८८०४) या दोन्ही पॅसेंजर गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा तब्बल ४ ते ६ तास उशिराने धावत असल्याने शिंदेवाही रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला.

स्थानकावर ताटकळत असलेल्या प्रवाशांमध्ये लहान बालके, महिला आणि वृद्ध नागरिकांची संख्या मोठी होती. भुकेने आणि तहानेने व्याकुळ झालेल्या प्रवाशांनी शेवटी प्रशासनाविरोधात एकत्र येत जोरदार हंगामा केला. प्रवासी रस्त्यावर आणि स्थानकावर न्यायाची मागणी करत असताना, मालगाड्यांना प्राधान्य देऊन पॅसेंजर ट्रेन रोखून धरल्याचा थेट आरोप प्रवाशांनी केला.

आक्रोशानंतर प्रशासनाला जाग प्रवाशांनी स्थानक मास्तरांकडे जाऊन संतप्त सवाल केले आणि रेल्वेच्या कारभारावर तीव्र आक्षेप नोंदवला. प्रवाशांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवत स्थानक मास्तरांच्या तक्रार वहीत (पावती क्रमांक १०६५१७) अधिकृत तक्रार नोंदवली. दोन्ही बाजूंच्या प्रवाशांनी तक्रार नोंदवून गोंधळ घातल्यानंतर स्थानक मास्तरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अहवाल (Reporting) दिला. त्यानंतर कुठे स्थानकात अडकवून ठेवलेल्या पॅसेंजर गाड्यांना पुढील प्रवासासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला.

रेल्वेच्या संचालनावर प्रवाशांचे गंभीर प्रश्न

या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रवाशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत:

सिस्टम की आक्रोश? ट्रेनचे संचालन नियमांनुसार आणि सिस्टीमद्वारे होते की लोकांच्या ओरडण्या-चिल्लावण्यावर आणि आंदोलनावर? जर आंदोलनानंतरच ट्रेन सोडली जाते, तर असे आदेश देणारे अधिकारी कोण आहेत?

मालगाड्यांना प्राधान्य का? गोंदिया-बल्लारशा या मार्गावर रोजच्या रोज मालगाड्यांना सर्रास प्राधान्य दिले जाते आणि सामान्य प्रवाशांच्या पॅसेंजर ट्रेन ५ ते ६ तास रोखून धरल्या जातात.

प्रवाशांचे हाल: पाऊस असो वा कडक ऊन, स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची सोय नसताना लहान मुलांना घेऊन तासनतास वाट पाहणे प्रवाशांसाठी असह्य झाले आहे.

लोकांच्या तीव्र आक्रोशानंतर आणि लेखी तक्रारीनंतरच ट्रेन रवाना होण्याची ही पहिलीच वेळ या मार्गावर पाहायला मिळाली. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक सुधारावे आणि मालगाड्यांच्या नादात सामान्य प्रवाशांना वेठीस धरणे बंद करावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.