– निवृत्त शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनाही प्रवेशबंदी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी
नरखेड :- राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याला पेन्शन अदालत आयोजित केली जाते. मात्र, नागपूर जिल्हा परिषद प्रशासनाने या व्यवस्थेत बदल करून पेन्शन अदालत दर महिन्याऐवजी तीन महिन्यांतून एकदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संघटनांच्या प्रतिनिधींनाही पेन्शन अदालतीत प्रवेश नाकारण्यात येणार असल्याने वाद निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२५ पासून दर महिन्याला आयोजित होणारी पेन्शन अदालत आता तीन महिन्यांतून एकदा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनाची दिशाभूल केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप सेवानिवृत्त शिक्षकांकडून करण्यात येत आहे. याशिवाय, नव्या व्यवस्थेनुसार केवळ वैयक्तिक समस्या असलेल्या निवृत्त शिक्षकांनाच उपस्थित राहता येणार असून, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वयोमानानुसार अनेक निवृत्त शिक्षक विविध आजारांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांना वारंवार जिल्हा परिषद कार्यालयात येणे शक्य होणार नाही. मग तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागल्यास त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण कसे होणार, असा सवाल निवृत्त शिक्षकांनी उपस्थित केला आहे. ज्येष्ठ पेन्शनधारकांच्या अडचणींचा विचार करून प्रशासनाने पूर्वीप्रमाणे दर महिन्याला पेन्शन अदालत घ्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या नागपूर येथील निवडश्रेणी प्रशिक्षण केंद्र (गट साधन केंद्र) येथील सदिच्छा भेटीदरम्यान निवृत्त शिक्षकांच्या प्रतिनिधिमंडळाने जिल्हा महासचिव दीपक सावळकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतली. यावेळी प्रतिनिधींनी पेन्शन अदालतीच्या निर्णयासह विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी आमदार अडबाले यांनी मोबाईलद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी यांच्याशी चर्चा केली. मात्र, चर्चेदरम्यानही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला नसल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. निवृत्त शिक्षकांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्यानंतर आमदार अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनानंतर संघटनेच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन या विषयावर प्रत्यक्ष सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी विजय ठाकरे आणि बंडू राऊत यांनीही निवृत्त शिक्षकांच्या सर्व मागण्यांना पाठिंबा दर्शविला. आमदार अडबाले यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून समस्यांचे लवकर निराकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.या प्रतिनिधिमंडळात निवृत्त शिक्षक संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष अरुण बेंडे, सचिव मधुकर फरतोडे, कार्याध्यक्ष शेषराव टाकळखेडे, उपाध्यक्ष मोरेश्वर साबळे, कार्यालय सचिव पुरुषोत्तम चरपे, मुख्य संघटन प्रमुख प्रकाश केने, प्रचार प्रमुख नंदकिशोर गमे यांच्यासह मोठ्या संख्येने निवृत्त शिक्षक उपस्थित होते.






