– आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत नरखेड येथे पीककर्ज वितरण व कर्जमाफीच्या आढावा
नरखेड :- शेतकऱ्यांना वेळेत आणि सुरळीत पीककर्ज उपलब्ध करून देण्यासोबतच शासनाच्या कर्जमाफी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नरखेड येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पीककर्ज वितरण, प्रलंबित कर्जप्रकरणे आणि कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार चरणसिंह ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत पीककर्ज वितरणातील अडथळे, प्रलंबित कर्जप्रकरणे, बँकांकडून करण्यात येणारी कार्यवाही तसेच कर्जमाफी प्रक्रियेची माहिती घेतली.
बैठकीला संबोधित करताना आमदार ठाकूर म्हणाले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे पीककर्ज मिळविताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. पात्र शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देणे, प्रलंबित कर्जप्रकरणांचा तातडीने निपटारा करणे आणि शासनाच्या कर्जमाफी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत बँक अधिकारी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे. पीककर्ज वितरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, नरखेडचे तहसीलदार भागवत पाटील, श्रीमती निकम, एलडीएम पटले, नगराध्यक्ष मनोज कोरडे, उकेश चव्हाण, प्रवीण लोहे, शामराव बारई, राजू हरणे, संजय कामडे, दिलेश ठाकरे, राजेश क्षीरसागर, अक्षय विरखडे यांच्यासह विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च प्राधान्याचे असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीककर्ज वितरण आणि कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता व तत्परता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार चरणसिंह ठाकूर यांनी यावेळी दिली.






