spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात ४ व ५ डिसेंबरला दोन दिवसीय ‘लोकसंवाद साहित्य, संस्कृती संमेलन’

– राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत मुनींद्र धर्मदाय प्रतिष्ठानचा उपक्रम; कवी प्रमोदकुमार अणेराव संमेलनाध्यक्ष

हंसराज,भंडारा :- मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) पुरस्कृत आणि मुनींद्र धर्मदाय प्रतिष्ठान, भंडारा यांच्या वतीने येत्या ४ व ५ डिसेंबर रोजी दोन दिवसीय ‘लोकसंवाद साहित्य आणि संस्कृती संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. बेला येथील महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन पार पडणार असल्याची माहिती मुख्य संयोजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांनी मंगळवारी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या संमेलन स्थळाला ‘महात्मा ज्योतिबा फुले साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे.

‘दीनबंधू भास्करराव पांढरीपांडे सभामंडप’ व ‘डॉ. अनिल नितनवरे विचार मंचा’वर हे संमेलन पार पडेल. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, कथाकार आणि चित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांची निवड करण्यात आली असून, ज्येष्ठ कवी व अनुवादक प्रफुल्ल शिलेदार संमेलनाचे उद्घाटक असतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव रामकुमार गजभिये जबाबदारी सांभाळत आहेत. पत्रकार परिषदेला संमेलनाध्यक्ष व आयोजक उपस्थित होते.

मान्यवरांची उपस्थिती आणि कला-साहित्याची मेजवानी या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे (नागपूर), साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्रवीण बांदेकर (सिंधुदुर्ग), ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर (नाशिक) आणि ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसीय संमेलनात दोन परिसंवाद, दोन कविसंमेलने, गझल मैफल, प्रकट मुलाखत, एकपात्री प्रयोग, महिलांची दंडार, गीत गायन आणि संगीत वादन आदी बौद्धिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. तसेच प्रमोदकुमार अणेराव, महादेव साठवणे आणि डॉ. सावन धर्मापूरीवार यांच्या चित्रांचे भव्य प्रदर्शनही येथे भरवण्यात येणार आहे.

पहिल्या दिवसाचे कार्यक्रम (४ डिसेंबर) : संमेलनाची सुरुवात ४ डिसेंबर रोजी सकाळी संविधान व ग्रंथ दिंडीने होईल. त्यानंतर होणाऱ्या उद्घाटन समारंभात काही लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. पहिल्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार अतुल पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकसंवाद आणि लोकमाध्यमे’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी निमंत्रितांचे कविसंमेलन, तर सायंकाळी ५:०० वाजता महेंद्र गोंडाणे यांचा ‘भाकर’ हा एकपात्री प्रयोग सादर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी पहिल्या दिवसाची सांगता होईल.

दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम (५ डिसेंबर) : दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता ‘भंडारा जिल्ह्यातील लोकजीवन व लोककला’ या विषयावर चर्चासत्र होईल. याच्या अध्यक्षस्थानी रा. तु. म. नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शैलेंद्र लोंढे असतील. त्यानंतर गझल मैफल आणि केवळ विद्यार्थ्यांसाठी ‘उगवतीचे रंग’ हे कविसंमेलन रंगेल. धानोड येथील संस्कार महिला मंडळाची दंडार, तसेच लेखक ताराचंद खांडेकर यांची प्रसेनजीत गायकवाड घेणार असलेली प्रकट मुलाखत हे या दिवसाचे आकर्षण ठरेल. सायंकाळी संगीतकार केशव यांच्या संगीत वादनानंतर संमेलनाचा समारोप होईल.

Popular Articles