नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्वसंध्येवर नागपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन व भीमसैनिकांचा भव्य मेळावा, बुधवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आय.टी.आय. मैदान, दिक्षाभुमी रोड, श्रध्दानंदपेठ येथे संपन्न होत आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक नेते दिवंगत बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त पक्षाच्या अधिवेशन मंचाला बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी मंच असे नामकरण करण्यात आले आहे.
पक्षाचे 45 वे राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केन्द्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, एकतावादी रिपब्लिकन चे नेते नानासाहेब इंदिसे आदि नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनात पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक होत असून त्यात पक्षाच्या विविध राज्यांचे प्रमुख तसेच महाराष्ट्राचे प्रभारी गोपाळराव आटोटे, राज्य प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हेंवणे, प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले सहभागी होतील. या महत्वपूर्ण बैठकीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, मागासवर्गीयांचे आरक्षण, खाजगी विद्यापीठे व उद्योग क्षेत्रात आरक्षण, पीडित शेतक-यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी व महागाई याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.
सोबतच बुध्दगया येथील महाबोधी महाविहार मुक्तिसाठी दि. 14 आक्टोबर 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर विराट मुक्ति मोर्चा आयोजित करण्यात आला असुन महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन कृति समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात राज्यातील सर्वच व आंबेडकरवादी संघटना आणि भीमसैनिक मेळाव्याला देशभरातुन 35 हजार भीमसैनिक सहभागी होणार आहेत अशी माहिती प्रा जोगेंद्र कवाडे यांनी दिली. पत्रपरिषदेला उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सोबतच शहर अध्यक्ष कैलास बोंबले, कार्यालय सचिव भीमराव कळमकर, विजय पाटील, दिलीप पाटील, रवी वाघमारे, मृणाल गोस्वामी, डॅनी शामकुवर, बापू भोंगाडे, हिमांशू मेंढे, भीमराव देशपांडे आणि आत्माराम वंजारी यांची उपस्थिती होती.




