नवी दिल्ली १३ – निवडणूक आयोगावर भाजपशी संगनमत आणि मतदार यादीत छेडछाड केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी संसदेतून बाहेर पडताना माध्यमांशी बोलताना त्यांनी “पिक्चर अभी बाकी है” म्हणत निवडणूक आयोगाला इशारा दिला आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ हे मूलभूत कर्तव्य आयोग पार पाडत नाही अशी टीका केली.
राहुल गांधींचा आरोप आहे की, गेल्या वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रात मतदार यादीत फेरफार झाला, आणि आता ‘एसआयआर’च्या माध्यमातून बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती करण्याची तयारी सुरू आहे. “ही केवळ काही जागांची बाब नसून, राष्ट्रीय पातळीवर नियोजनबद्ध पद्धतीने मतदारांची लूट होत आहे. पूर्वी आमच्याकडे पुरावे नव्हते, आता ठोस पुरावे आहेत,” असे ते म्हणाले.
राहुल गांधींचा सिक्रेट प्लॅन – भाजपची डोकेदुखी वाढली
भाजपच्या डिजिटल प्रचारशैलीला उलट करून, राहुल गांधींनी ‘व्होट चोरीविरोधात’ डिजिटल जनआंदोलन उभारले आहे. या मोहिमेला अवघ्या 24 तासांत प्रचंड प्रतिसाद मिळाला –
- 15 लाखांहून अधिक समर्थन सर्टिफिकेट डाउनलोड
- 9650003420 या क्रमांकावर 10 लाखांपेक्षा जास्त मिस्ड कॉल
त्याचबरोबर मतदार हक्क अबाधित ठेवण्यासाठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
संसद ते सडक – इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन
राहुल गांधींनी पुरावे सादर करून निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यानंतर संसदेतून थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत 300 खासदारांसह मोर्चा काढण्यात आला. यामुळे विखुरलेल्या इंडिया आघाडीची एकजूट दिसून आली आणि राहुल गांधींचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित झाले. ठाकरे सेनेने तर या आंदोलनाची तुलना जयप्रकाश नारायणांच्या नवनिर्माण आंदोलनाशी केली.
भाजपला थेट इशारा
भारत जोडो यात्रेनंतर रस्त्यावर जनआंदोलन उभारणारे राहुल गांधी आता संसद, रस्ता आणि डिजिटल माध्यमातूनही भाजप व निवडणूक आयोगावर दबाव वाढवत आहेत. “पिक्चर अभी बाकी है” म्हणत त्यांनी पुढील काळात आणखी आक्रमक रणनीतीचा संकेत दिला आहे.
दिल्लीतील आंदोलनात 30 पक्षांचे 300 खासदार सहभागी झाले, जे राहुल गांधींच्या मोहिमेच्या यशाचे द्योतक मानले जात आहे. आता सर्वांच्या नजरा राहुल गांधींच्या पुढील पावलांकडे लागल्या आहेत.








