Home Latest News आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचा गंभीर आरोप

आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन; रोहित पवारांचा गंभीर आरोप

0
58

 

मुंबई 29 : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील तब्बल ४८ तासांचा प्रवास करून शुक्रवारी सकाळी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. त्यांच्या सोबत हजारो आंदोलकांनीही आझाद मैदान गाठले असून, जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत दाखल झाल्यानंतरही सरकारकडून कोणतीही सोय न केल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवारांचा आरोप

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आंदोलकांची गंभीर गैरसोय होत असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत, पण त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची, पिण्याच्या पाण्याची किंवा स्वच्छतागृहांची काहीच व्यवस्था सरकारने केलेली नाही. हे सरकारकडून मोठे दुर्लक्ष आहे.”

खाऊगल्ल्या बंद का?

पुढे रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे काढले आहेत. “मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरू ठेवायला हव्यात. आंदोलकांना जेवण मिळावे म्हणून गृहविभागाने त्वरित खाऊगल्ल्या सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.

“सरकार मोठी चूक करत आहे”

पवार पुढे म्हणाले, “सरकार आंदोलकांना दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर ती मोठी चूक ठरेल. गृहमंत्री हुशार आहेत, त्यांनी दुसऱ्यांदा चूक होऊ देऊ नये.”

जरांगे पाटलांचा निर्धार

मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून, आझाद मैदानावर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांच्या प्रचंड संख्येमुळे सकाळी मुंबईतील अनेक भागांत वाहतूककोंडी झाली होती. काही वाहनं रस्त्यावरच उभी राहिल्याने जरांगे पाटील यांनी स्वतः लोकांना आवाहन केले की, “वाहने बाजूला लावा, पोलिसांना सहकार्य करा आणि मुंबईचे रस्ते मोकळे ठेवा.”