किशोर साहू, मौदा:- नागपूर जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी ‘ज्ञानरथ :- Driving the Future to our School’ या उपक्रमाचा रथ बुधवार (ता. 16 सप्टेंबर)ला पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दहेगाव येथे दाखल झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ३डी प्रिंटर तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या संकल्पनेतून हा ‘एआय लॅब ऑन व्हील्स’ उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील १५१२ शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव भुते यांच्यासह शिक्षकवृंद सुधीर खंडाईत, सुधीर कांबळे, राजेश रोहाड, सुजाता बोदेले, प्रज्ञा रामटेके, संगीता आंबीलढुके, ज्योती आंबीलढुके, पुष्पा उके, उमेश उके, रंजना उके व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ज्ञानरथातील व्हीआर किट व रोबोटिक्स मॉड्यूल हाताळून आनंद व्यक्त केला. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण होईल, असे मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी सांगितले.





