Home Latest News नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई

नागपुरात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत वेश्याव्यवसायावर पोलिसांची कारवाई

0
51

 

नागपूर १४ : नागपूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभागाने सिताबर्डी येथील एका सलूनवर छापा टाकून देहव्यापार चालवणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे.

ही कारवाई मंगळम अपार्टमेंट, खरे टाऊन, धरमपेठ येथील ‘लुक बूक बाय इनारा, युनिसेक्स सलून’ येथे करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या ठिकाणी दीपा आनंद गोदडे (वय ३५), रा. वाल्मिकी नगर, गोकुळपेठ ही सलूनची मालक असलेल्या पूजा रक्षित जोशी हिच्या साथीने आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवत होती.

पोलिसांनी केलेल्या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच, आरोपी महिलेकडून ३,००० रुपये रोख, एक डी.व्ही.आर., दोन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण ४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध सिताबर्डी पोलीस ठाण्यात कलम १४३(२) भा.न्या.सं., सहकलम ३, ४, ५, ७ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपी महिलेला सिताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कामगिरी वरिष्ठांच्या   मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक राहुल शिर, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नन्नावरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.