कामठी १० : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये पोस्टर वॉर जोरदार रंगला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आपल्या ताकदीचे प्रदर्शन सुरू केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही लढत केवळ मतपेट्यांपुरती न राहता रस्त्यांवरच्या पोस्टरच्या माध्यमातूनही रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काँग्रेसने “वोट चोर, गद्दी छोड” अशा घोषणाबाजीसह निषेध सभा घेतली होती. या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, तसेच इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहिले. या सभेत भाजपवर थेट वोट चोरीचे आरोप करण्यात आले, तसेच राज्याचे महसूल मंत्री आणि कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली.
काँग्रेसच्या या हल्ल्याला आता भाजपने पोस्टरबाजीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारी “किसान का पैसा खाने वाले “बेल” पर बाहर कांग्रेस नेता राजनीति छोड़, ये चोर, ये चोर मचाए शोर,” अश्या आशयाचे
पोस्टर्स शहरभर लावली गेली आहेत. यामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच चिघळले असून, दोन्ही पक्ष आपापल्या नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याप्रमाणे या पोस्टर वॉरकडे पाहत आहेत.
निवडणुकीपूर्वीच कलगीतुरा
येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून, दिवाळीनंतर या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आतापासूनच रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात प्रतिष्ठेची सरळसरळ लढत होणार आहे.
जिल्ह्यात दोन्ही नेते हे हेवीवेट मानले जातात. त्यामुळे या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे नागपूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. निकालांवरून दोन्ही पक्षांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याने ही लढत ऐन रंगात येईल, यात शंका नाही.
कार्यकर्त्यांमध्ये जोश
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. सभांमधील घोषणाबाजी, सोशल मीडियावरील प्रचार, तर आता पोस्टर वॉर, अशा विविध पद्धतींनी वातावरण रंगवले जात आहे.
एकीकडे काँग्रेस भाजपवर लोकशाही पायदळी तुडवण्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे भाजप काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर थेट निशाणा साधत आहे.
वाद विवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता
कामठीत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरणार नाही. जशी-जशी निवडणूक जवळ येईल, तशी पोस्टरबाजीसह सभा, मोर्चे, घोषणा, सोशल मीडिया वादविवाद अधिकच तीव्र होणार आहेत.
आतापर्यंतची स्थिती पाहता कामठीत आगामी निवडणुकीत पोस्टर वॉरच राजकीय अजेंडा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत




