spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोऱगाव–महागाव मार्गावरील रस्त्याची दुरवस्था; बससेवा बंद झाल्याने नागरिक संतप्त

– विद्यार्थी, शेतकरी व नोकरदारांचे हाल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना फटका, तातडीने रस्ता दुरुस्तीची जोरदार मागणी

पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज नेटवर्क प्रतिनिधी

नवेगाव बांध :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोऱगाव–निलज–मालकनपुर– माहुरकुडा–सिरोली–महागाव या महत्त्वाच्या मार्गावरील डांबरी रस्ता पूर्णतः खड्डेमय व धोकादायक बनल्याने अखेर साकोली आगाराने या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार यांची मोठी गैरसोय होत असून परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबरी थर आणि पावसामुळे चिखलमय झालेला रस्ता यामुळे वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. बसचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून अखेर साकोली आगाराने या मार्गावरील बससेवा स्थगित केली. परिणामी, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

या मार्गावरून दररोज शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालये तसेच रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची शेतीची कामे, व्यापारी व्यवहार तसेच रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचणे कठीण झाले आहे. अनेकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मे महिन्यात साकोली आगाराने संबंधित ग्रामपंचायतींना पत्र पाठवून या मार्गाची तातडीने दुरुस्ती किंवा नव्याने बांधकाम करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही संबंधित यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याने अखेर बससेवा बंद करण्याची वेळ आली. हा प्रकार प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

स्थानिक नागरिकांनी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून पुन्हा बससेवा पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

“रस्ता दुरुस्त करा; बससेवा तातडीने सुरू करा!”

मोऱगाव–महागाव मार्ग हा अनेक गावांचा जीवनदुवा मानला जातो. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग आज प्रवाशांसाठी संकटाचा ठरला आहे. बससेवा बंद झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसत असून, रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करून बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Popular Articles