– २३ ऑगस्ट रोजी भंडारा प्रधान डाकघर व साकोली उपडाकघरात राखी बुकिंगची सुविधा
भंडारा :- रक्षाबंधनाचा सण जवळ आला असून, बहिणीच्या प्रेमाचा धागा असलेली राखी भावापर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी बहिणींकडून राखी पाठविण्याची लगबग सुरू झाली आहे. भावंडांच्या या जिव्हाळ्याच्या नात्याला अधिक सुलभ आणि विश्वासार्ह टपाल सेवेची जोड देत नागपूर ग्रामीण डाक विभागाने विशेष व्यवस्था केली आहे.
रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी भंडारा जिल्ह्यातील भंडारा प्रधान डाकघर आणि साकोली उपडाकघर राखी बुकिंगसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्टवर १० टक्के सवलत
राखी जलद आणि सुरक्षितपणे प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घेता येणार आहे. रक्षाबंधनानिमित्त राखी पाठविण्यासाठी स्पीड पोस्ट दरावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे.
परदेशातही पोहोचणार बहिणीच्या प्रेमाची राखी
भावंडांमधील अंतर कितीही असले तरी प्रेमाचा धागा पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाची आंतरराष्ट्रीय टपाल सेवा उपलब्ध आहे. परदेशात राहणाऱ्या भावालाही राखी पाठविता येणार असून, यासाठी विशेष राखी लिफाफेही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
रक्षाबंधनाच्या या आनंदाच्या पर्वावर बहिणीच्या प्रेमाची राखी भावापर्यंत वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी नागरिकांनी स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा तसेच १० टक्के सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक, नागपूर ग्रामीण विभाग, नागपूर सुनील हिवराळे यांनी केले आहे.





