पदव्युत्तर तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र विभागाचे आयोजन
नागपूर २१ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर तत्वज्ञान व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागात अँटी रॅगिंग मार्गदर्शन कार्यक्रम आणि पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागातील प्रेक्षागृह येथे हा कार्यक्रम सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी वक्ता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ येथील वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापिका डॉ. पायल ठावरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संयोजक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सत्यप्रिय इंदूरवाडे व तत्त्वज्ञान विभाग कार्यवाह प्रमुख डॉ. धीरज कदम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सत्यप्रिय इंदूरवाडे यांनी प्रास्ताविकतेने केली. त्यानंतर डॉ. पायल ठावरे यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अँटी-रॅगिंगसंदर्भातील कायदे व नैतिक पैलू, त्याची प्रतिबंधात्मक पावले तसेच जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. संचालन स्वप्नील काचोरे यांनी केले तर अतिथी वक्त्याचा परिचय कु. सबा कॉसर यांनी करून दिला. व्याख्यानानंतर लगेचच रॅगिंगविरोधी जाणीव जागृती या विषयावर पोस्टर सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये विविध विभाग व महाविद्यालयांतून स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले. सौ. आचल मर्कंडे (एम.ए. भाग-द्वितीय, तत्त्वज्ञान विभाग) हिने प्रथम क्रमांक मिळविला. कार्यक्रमाची सांगता डॉ. धीरज कदम यांच्या आभार मानून झाली. हा कार्यक्रम उपयुक्त व आकर्षक ठरला तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगविरोधी उपाययोजनांच्या महत्त्वाबद्दल कार्यक्रमाने जागरूकता निर्माण केली.




