जाटतरोडी उपकेंद्रातून 3 वीजवाहिन्या लवकरच कार्यान्वित होणार
नागपूर, दि २१ : नागपूर शहराच्या वीजपुरवठा यंत्रणेला अधिक मजबूत करण्यासाठी शहरातील जाटतरोडी भागात नव्याने उभारलेल्या 132/33 केव्ही उपकेंद्रातून 33 केव्ही क्षमतेच्या तीन नवीन वीजवाहिन्या लवकरच कार्यान्वित होणार असून त्यांची यशस्वी चाचणी करण्यात आली. यामुळे शहरातील दक्षिण भागातील हजारो वीजग्राहकांना अखंडित आणि अधिक चांगला वीजपुरवठा मिळणार आहे.
नवीन उपकेंद्र, नवीन वीजवाहिन्या
जाटतरोडी येथे महापारेषणने नुकतेच 132 केव्ही डबल सर्किट भूमिगत केबल्सच्या मदतीने 132/33 केव्ही उपकेंद्र सुरू केले होते. याच उपकेंद्रातून मंगळवारी (19 ऑगस्ट) 33 केव्ही जाटतरोडी, 33 केव्ही मॉडेल मिल आणि 33 केव्ही मेडिकल या तीन नवीन वीजवाहिनाम्ची यशस्वी चाचणी करण्यात आली असून या वाहिन्या लवकरच कार्यान्वित होणार आहेत.. या वाहिन्या कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील मॉडेल मिल, मेडीकल, गणेशपेठ, तुळशीबाग, म्हाडा, गोदरेज आनंदम्, वाठोडा आणि उमरेड रोड या भागातील ग्राहकांचा वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. यावेळी महावितरणच्या नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापात्रे व संजय मत्ते यांच्यासह महावितरण व महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अनेक उपकेंद्रांना मिळणार नवी ऊर्जा
या तीन नवीन वीजवाहिन्यांपैकी 0.5 किलोमीटर लांबीची डबल सर्किट 33 केव्ही जाटतरोडी वाहिनी खूप महत्त्वाची आहे. या वाहिनीमुळे मॉडेल मिल, गणेशपेठ आणि तुळशीबाग उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यासाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच वीजपुरवठ्याची गुणवत्ताही सुधारेल.
याच भेटीदरम्यान, अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी 33/11 केव्ही मॉडेल मिल उपकेंद्राला भेट देऊन संपूर्ण वीजपुरवठा यंत्रणेचा आढावा घेतला. यात त्यांनी 33/11 केव्ही म्हाडा, गोदरेज आनंदम्, वाठोडा आणि उमरेड रोड या उपकेंद्रांना नवीन जाटतरोडी वाहिनीतून वीजपुरवठा कसा करता येईल याची तपासणी केली. यामुळे भविष्यात कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास, तात्काळ पर्यायी व्यवस्था करून तो पुन्हा सुरू करणे सोपे होईल.
इलेक्ट्रिक बसेसला मिळणार चालना
यासोबतच, शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेतील इलेक्ट्रिक बसेसचा वापर वाढावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी नवीन 33/11 केव्ही 5 एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. हे काम ‘समर्पित वितरण सुविधा’ (डीडीएफ) योजनेअंतर्गत सुरू असून, यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंगची सुविधा अधिक सोयीस्कर होणार आहे.
या नवीन उपकेंद्रामुळे दक्षिण नागपुरातील वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांनी व्यक्त केला आहे.



