वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांचा महावितरणला इशारा

0
21

– घोन्सी शिवारातील डीपीवरील सिंगल फेज बंद, शेतकरी त्रस्त

पांढरकवडा :- केळापूर तालुक्यातील घोंन्सी शिवार, बुलढाणा वेअर हाऊस परिसर तसेच नांदेकर डीपी अंतर्गत येणाऱ्या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर समस्येबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन सादर करून तातडीने सुरळीत वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, परिसरात दिवसभरात तब्बल ४ ते ५ वेळा अचानक ट्रिपिंग होत असून, २७ जुलैपासून रात्री सिंगल फेज वीजपुरवठाही पूर्णपणे बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या पिकांचा हंगाम सुरू असून रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. मात्र वीज नसल्याने सिंचनाची कामे ठप्प झाली आहेत. याशिवाय शेतात जंगली डुकरे व सापांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे.

महावितरणने तात्काळ तांत्रिक बिघाड दूर करून नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.