पांढरकवडा :- केळापूर तालुक्यातील पाटणबोरी ग्रामपंचायतीमध्ये जून २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १ कोटी १८ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप माजी उपसरपंच अनिल मधुकर पुल्लजवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई न झाल्यास ५ दिवसांत आमरण उपोषण करण्याचा इशारा गटविकास अधिकारी (BDO), पंचायत समिती पांढरकवडा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, मागील ४ वर्षांच्या कालावधीत सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी शिल्लक असताना कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत. जून २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत १ कोटी १८ लाख रुपये विड्रॉल करून प्रत्यक्ष साहित्य खरेदी न करता अथवा बोगस साहित्य खरेदी दाखवून खोटी बिले जोडण्यात आली आहेत. ग्रामपंचायतीच्या कॅश बुकची व बोगस बिलांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या भ्रष्टाचारात तत्कालीन उपसरपंच कपिल दरवरे, तत्कालीन सरपंच, सचिव तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तत्कालीन उपसरपंचांनी पदाचा दुरुपयोग करून सरपंचांच्या डिजिटल स्वाक्षरीचा (DSC) गैरवापर करत निधीची अफरातफर केल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून विशेष समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे. येत्या ५ दिवसांच्या आत यावर योग्य ती चौकशी सुरू न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद यवतमाळ यांनाही पाठवण्यात आली आहे.
यावेळी माजी उपसरपंच अनिल मधुकर पुल्लजवार, सुरेश शर्मा, ग्रामपंचायत सदस्य, अक्षय पारशावार, दिवाकर विश्राम, विनोद रामलू निमसरकार, प्रमोद तोटावार सह पाटणबोरीतील नागरिक उपस्थित होते.





