स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ” सागरास ” या कवितेला नुकतीच ११६ वर्ष पूर्ण झालीत. ह्याचेच औचित्य साधून नुकतेच अंदमान येथील विजयपुरम मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात आले.
यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, पुणे , शाखा-नागपूर तर्फे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक आगळीवेगळी आदरांजली देण्यात येत आहे. येत्या २१ डिसेंबर २०२५ ला संध्याकाळी ६ वाजता, अमेय दालन विदर्भ साहित्य संघ नागपूर येथे कांचन गडकरी, (सामाजिक कार्यकर्त्या) तसेच प्रदीप दाते (अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, नागपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत …सागरा प्राण तळमळला (एक सांगितिक अभिवाचन) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
..सागरा प्राण तळमळला हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित दीर्घांक नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका व्याख्यात्या आणि साहित्यिक व सावरकर अभ्यासक डॉ. शुभा साठे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेला आहे. तसेच याचे दिग्दर्शन, नागपुरातील गेली अनेक वर्ष नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ.अनिकेत मुनशी यांनी केलेले आहे.याला पार्श्वसंगित शशांक साठे, यांनी दिलेले आहे.
यात डॉ. अनुराधा मुनशी, प्रा. गौरव गोंधळेकर, स्वाती गोंधळेकर, डॉ. अनिकेत मुनशी, सुश्रुत मास्टे आणि डॉ. शुभा साठे या सगळ्यांनी अभिवाचनातून अनेकविध भूमिका साकारल्या आहेत. 1 ते 1.30 तासाचा हा दीर्घांक म्हणजे सावरकर प्रेमींसाठी एक अतिशय उत्कृष्ट अशी साहित्यिक आणि सांगीतिक मेजवानी आहे.
स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, पुणे या संस्थेतर्फे स्वा सावरकरांचे विचार घरोघर पोहचवण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे दिनदर्शिका! दरवर्षी स्वा सावरकरांना समर्पित असा दिनदर्शिकेचा विषय असतो. यंदाचा विषय आहे क्रांतिपुष्प .
या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, पुणे, हे देखील उपस्थित असणार आहेत. उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या हातून दिनदर्शिकेचे प्रकाशन होईल.
अत्यंत अविस्मरणीय अश्या ह्या दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिकांनी मोठ्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती, संस्थेच्या नागपूर शहर अध्यक्षा डॉ. अनुराधा मुनशी यांनी केलेली आहे. कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क आहे.




