spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २९२ उमेदवारांची प्राथमिक निवड

– डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

– युवकयुवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५९७ उमेदवारांची नोंदणी

यवतमाळ :- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि विद्या भवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून आज माजी राज्यमंत्री तथा राज्यस्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते यवतमाळ येथील मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात मुलाखतीअंती २९२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

विद्या भवन कॉलेज येथे आयोजित या कार्यक्रमाला रोजगार मेळावा समन्वयक समितीचे राजू पडगिलवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशील उचले, विद्या भवन कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रणय कोरे, जिल्हा कामगार अधिकारी विजय गुल्हाणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५९७ उमेदवारांनी नोंदणी केली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तसेच विविध खासगी आस्थापनांतील भरती प्रक्रियेसह एकूण ३३८ रिक्त पदांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यापैकी २९२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, केरॉस सिक्युरिटी हेल्थ अँड कंपोझिट सर्व्हिसेस प्रा. लि., जय अॅग्रो इंडस्ट्रीज एमआयडीसी यांसह विविध आस्थापनांनी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत विविध कंपन्या व संस्थांमध्ये प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवकयुवतींसाठी विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. रोजगारासोबतच शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थित युवकांनी समाधान व्यक्त केले.

कौशल्य विकास हा युवकांसाठी रोजगाराचा मार्ग

यावेळी उद्घाटक डॉ. रणजीत पाटील यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तसेच शासनाच्या विविध रोजगाराभिमुख योजनांची माहिती प्रत्येक युवकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध होत असल्याने रोजगार मार्गदर्शन केंद्रांमध्ये योजनांची माहिती सातत्याने डिजिटल माध्यमातून प्रदर्शित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कौशल्य विकासातूनच युवकांसाठी रोजगाराचा मार्ग खुला होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Popular Articles