· क्रीडा संस्कृती मजबूत करण्यासह 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी करण्याचे आवाहन;
· IIT मुंबईत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
मुंबई :- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘खेलो इंडिया डायलॉग 2026’च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकताच देशातील युवकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. मुंबईत हा कार्यक्रम आयआयटी मुंबईच्या पी.सी. सक्सेना सभागृहात आयआयटी मुंबई आणि माय भारत मुंबई यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधानांच्या संवादात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, आंतरराष्ट्रीय हेप्टॅथलॉनपटू नंदिनी अगासरा, संचालक प्रा. शिरीष केदारे, माय भारत महाराष्ट्राचे राज्य संचालक अमित पुंडे आणि माय भारत मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

दैनंदिन जीवनात क्रीडा व व्यायामाला महत्त्व देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
‘खेलो इंडिया डायलॉग’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या दैनंदिन जीवनात क्रीडा आणि शारीरिक व्यायामाचा समावेश करण्याचे आवाहन केले. देशातील क्रीडा परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच भारतात मजबूत क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताच्या तयारीच्या दृष्टीने देशभरातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. या संवादामुळे युवकांना भारताला जागतिक स्तरावरील मजबूत क्रीडा राष्ट्र बनविण्याच्या केंद्र सरकारच्या दृष्टिकोनाची माहिती मिळाली.
संवादानंतर आंतरराष्ट्रीय हेप्टॅथलॉनपटू नंदिनी अगासरा यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या क्रीडा प्रवासातील अनुभव सांगितले.
2022 मध्ये त्यांनी 100 मीटर अडथळा शर्यतीत भारतीय अंडर-20 राष्ट्रीय विक्रम नोंदविला तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. त्यानंतर 2025 च्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून त्यांनी देशाचा गौरव केला.
‘खेलो इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे युवा खेळाडूंना आपली क्रीडा गुणवत्ता ओळखण्याची, विकसित करण्याची आणि उच्च स्तरावर पोहोचण्याची संधी मिळत असल्याचे नंदिनी अगासरा यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सर्वांगीण सहकार्याबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले.
‘नशामुक्त आयआयटी मुंबई’साठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘नशामुक्त आयआयटी मुंबई’ निर्माण करण्यावर भर दिला. युवकांनी अमली पदार्थ आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी निरोगी, शिस्तबद्ध आणि उत्पादक जीवनशैली आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी नशामुक्त समाजाचे दूत बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उपस्थित विद्यार्थी आणि युवकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. अमली पदार्थ व व्यसनांपासून दूर राहण्यासह निरोगी, सक्षम आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयआयटी मुंबईमध्ये क्रीडा परिसंस्थेचा विकास करण्यासह विद्यार्थ्यांचा क्रीडा व शारीरिक उपक्रमांमधील सहभाग वाढविण्यावर त्यांनी भर दिला.








