– सात दिवसांत दूषित पाण्याचे निराकरण करण्याच्या सूचना
नागपूर :- उन्हाळा सुरू होणार हे लक्षात घेऊन मनपाच्या जलप्रदाय विभागाने आणि ओसीडब्ल्यूने शहरात अधिक दाबाने पाणी पुरवठा करावा. शहरात विविध ठिकाणी दूषित पाण्याची तक्रार आल्यास त्याचे लवकरात लवकर निराकरण करावे. तसेच, यापूर्वी ज्या नागरिकांना पाण्याचे पाचपट बिल आले आहे, त्या पाचपट वाढीव देयकांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. त्याचबरोबर, पाण्याची पाईपलाईन टाकल्यानंतर त्याचे गुणवत्तापूर्वक पूर्णभरण करण्यात यावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना महापौर निता ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 18) दिले.
मनपा मुख्यालयातील उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात जलप्रदाय विभागाची आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अधीक्षक अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर यांच्यासह मनपा आणि ओसीडब्ल्यूचे अधिकारी–कर्मचारी आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेच्या एकूण 103 पाण्याच्या टाक्या असून, यामध्ये 4 स्मार्ट सिटीच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्यांमधून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना दरमहा सुलभरित्या पाण्याचे बिल भरता यावे, याकरिता जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यू तर्फे क्यूआर (QR) कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शिवाय, पाणी बिल तयार झाल्यानंतर लगेच नागरिकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून ऑनलाई बिल भरण्याची माहिती दिली जाते. ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण 33 टक्क्यांवरून 48 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी महापौर निता ठाकरे यांना यावेळी दिली.
ओसीडब्ल्यू कडून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने त्याचा सर्वसामान्य रोष मनपावर काढला जातो. त्यामुळे दूषित पाण्याच्या समस्येच्या तक्रारींचे लवकरात लवकर 7 दिवसांच्या आत निराकरण करण्यात यावे. शिवाय, ज्या ठिकाणी अशा समस्या सुटण्यास वेळ लागत असेल, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. पाण्याच्या बीलातील पाचपट वाढीव देयकांमध्ये तातडीने दुरुस्ती करण्यात यावे. नाहीतर मनपा कंपनीला दंड आकारेल. शिवाय ज्या ठिकाणी पाणी गळती होत असेल, त्या ठिकाणी डिटेक्शन मशीनद्वारे तपासणी करून ती समस्या सोडविण्यात यावी. याशिवाय, शहरातील विविध ठिकाणी घरगुती आणि वाणिज्यिक अवैध नळ कनेक्शन शोधून ते खंडित करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आवश्यकता पडल्यास पोलिसांची मदत घेण्यात यावी, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले. याशिवाय, हुडकेश्वर-नरसाळा भागात पाण्याचे बिल भरण्याकरिता म्हाळगीनगर येथे केंद्र सुरू करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.
तसेच, शहरात ठिकठिकाणी अवैध वाणिज्यिक प्लॉटधारकांकडूनही पाण्याचा वापर वाढला असून विविध ठिकाणी गोडाऊन आणि वॉशिंग सेंटरची वाढ झाली आहे. परंतु, त्याची नोंद घरगुती असल्याचे दर्शवून वापर मात्र वाणिज्यिक केला जात आहे. अशा ठिकाणी अवैध पद्धतीने पाण्याचा वापर करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याचे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी दिले. शिवाय, टील्लू पंप वापरणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याचे निर्देश यावेळी बैठकीत देण्यात आले.




