spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खाप्यात करवाढीविरोधात जनआक्रोश; नगर परिषदेवर नागरिकांचा हल्लाबोल, शेकडो नागरिकांचा एल्गार

– वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची जोरदार मागणी, आठ दिवसांत निर्णयाचे आश्वासन

खापा, वार्ताहर :- खापा नगर परिषदेने २०२६ ते २०३० या फेरमूल्यांकनाच्या आधारे २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी लागू केलेल्या वाढीव मालमत्ता कराविरोधात गुरुवारी (दि. ३० जुलै) शहरात अभूतपूर्व जनआक्रोश उसळला. नगर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, खापा करवाढविरोधी कृती समिती तसेच विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले. वाढीव करविरोधातील घोषणांनी शहर दणाणून गेले, तर नगर परिषद कार्यालयासमोर झालेल्या सभेत कर तात्काळ मागे घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगणातून निघालेला मोर्चा बाजार चौक, गांधी पुतळा, भवानी माता मंदिर चौक मार्गे नगर परिषद कार्यालयावर धडकला. “करवाढ रद्द करा”, “जनतेची आर्थिक लूट थांबवा”, “सामान्य नागरिकांवर अन्याय बंद करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.

नगर परिषद कार्यालयासमोर झालेल्या सभेत गटनेते तथा नगरसेवक नामदेव गजभिये, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, नारायण लांबट, नगरसेवक मिलिंद बुरडे, आशिष ढाले, संजय सोनकुसळे, छगन कवळे तसेच नगरसेविका वैशाली लाड, कविता धराडे, प्रियंका बोकडे, मनोरमा श्रियाम आणि लीला बागडे यांनी वाढीव कर आकारणीचा तीव्र निषेध नोंदविला. नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता करण्यात आलेली करवाढ अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी सचिन राऊत आणि नगराध्यक्ष पियूष बुरडे यांना निवेदन सादर केले. वाढीव मालमत्ता कर तातडीने रद्द करावा, नागरिक व लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून पारदर्शक, न्याय्य आणि सर्वसामान्यांना परवडणारी कररचना निश्चित करावी, तसेच भविष्यात करनिर्धारण करताना नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.

मोर्चात माया कोहाळ, वंदना सुपारे, अंकित मुंगोले, मुकेश पावडे, संदीप गिरपुंजे, स्वप्निल धराडे, अखिल लाड, प्यारू शेख, मकसूद शेख, सक्षम तातेड, सुभाष धार्मिक, चिंतामण सुपारे, अशोक बारापात्रे, यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक सहभागी झाले. पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

‘आठ दिवसांत निर्णयाचा शब्द’

आंदोलनानंतर नगराध्यक्ष पियूष बुरडे यांनी आंदोलकांशी चर्चा करत वाढीव मालमत्ता कराचा प्रश्न येत्या आठ दिवसांत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडून सर्वानुमते योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे करप्रश्नी नगर परिषद नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

‘आश्वासन नव्हे, निर्णय हवा’

खापा करवाढविरोधी कृती समितीने केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट केले. वाढीव मालमत्ता कराबाबत प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. मागण्या मान्य न झाल्यास शहरव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत प्रशासनाने नागरिकांच्या भावना, आर्थिक अडचणी आणि लोकहिताचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

करवाढीच्या मुद्द्यावर उभ्या राहिलेल्या या व्यापक जनआंदोलनामुळे खाप्यातील नागरिकांच्या असंतोषाला स्पष्ट आवाज मिळाला आहे. आता नगर परिषद पुढील आठ दिवसांत कोणता निर्णय घेते, यावरच या आंदोलनाची पुढील दिशा आणि नागरिकांचा विश्वास अवलंबून राहणार आहे.

Popular Articles