spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एचपीव्ही लसीकरणाविषयी जनजागृती करा

– जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश

– एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा

यवतमाळ :- जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरणाबाबत महिला व मुलींमध्ये अधिक जनजागृती करण्यासाठी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रबोधन करावे, तसेच शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थीनींना समुपदेशनाद्वारे एचपीव्ही लसीकरणाची माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या सभेत एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागातील इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सविस्तर माहिती घेण्यात आली. रुग्णालयांमध्ये एचपीव्ही लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सुनियोजित आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

तसेच जिल्ह्यातील मंडळस्तरावर सुरू असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरां’मध्ये एचपीव्ही लसीकरणासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यासोबतच शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला बचत गटांचे प्रदर्शन भरवून त्यांना एचपीव्ही लसीबाबत माहिती देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

याबरोबरच सोशल मीडियावर एचपीव्ही लसीबाबत पसरत असलेले गैरसमज आणि मिथक दूर करण्यासाठी जनजागृतीपर माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिले.

Popular Articles