नागपूर, २२ – नागपूर शहरात प्रथमच दुर्मीळ प्रजातीचा “चापडा” साप (Bamboo Pit Viper) आढळून आला आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता भरतवाडा येथील निवासी विकास तुमसरे यांच्या घराजवळ झाडाच्या वेलावर हा साप दिसला.
याबाबतची माहिती मिळताच वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे सर्पमित्र अभिषेक रहांगडाले व आकाश सोनकुले घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणी करता, हा साप साधारणपणे 2 ते 2.5 फूट लांबीचा असून, तो “अतिविषारी चापडा” म्हणजेच Bamboo Pit Viper असल्याचे स्पष्ट झाले. सापाला सुरक्षितरीत्या पकडून नंतर ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सोपविण्यात आले.
नागपूर परिसरात या प्रजातीची नोंद यापूर्वी झालेली नसून, हा पहिलाच दाखला असल्याचे सर्पतज्ञांनी सांगितले.
चापडा (Bamboo Pit Viper) विषयी माहिती
हा साप वाइपर कुटुंबातील असून घोणसाइतकाच विषारी आहे.
तो प्रामुख्याने घनदाट जंगल व झाडाझुडपांत आढळतो.
वरून हिरवट रंगाचा व पोटाच्या बाजूने पिवळसर रंगाचा असतो.
डोके त्रिकोणी आकाराचे असते.
सामान्यतः याचा मानवाशी संपर्क क्वचितच येतो.
या शोधामुळे नागपूरातील जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असे वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे सर्पअभ्यासक नीतीश भांदक्कर यांनी सांगितले.


