कामठी :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कामठी तालुक्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून कामठी तालुक्यातील पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून ३० सप्टेंबरपूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांसह अद्याप मतदार यादीत नाव नोंदलेले नसलेल्या पात्र नागरिकांनी नमुना ६ चा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता अथवा अन्य तपशीलात त्रुटी आढळल्यास त्याबाबत दावे-हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. प्राप्त दावे व हरकतींची सुनावणी घेऊन २३ ऑक्टोबरपर्यंत निपटारा करण्यात येणार असून, ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी कामठी तालुक्यातील नागरिकांनी मतदार यादी तपासून आवश्यक ती कार्यवाही मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले.





