खापा, वार्ताहर :- ११ मे च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये वर्ग ९ व १० मिळुन २० विद्यार्थी असल्यास ३ शिक्षक मंजूर करण्याचे आदेश शासनाने ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांना अल्पसा दिलासा मिळाल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
१५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार राज्यातील हजारो शाळा शून्य शिक्षकी झालेल्या असल्याने व अनुदानित शाळा बंद होऊन गोरगरिबांचे शिक्षण बंद होणार असल्याने प्रहार शिक्षक संघटना सातत्याने पाठपुरावा करीत होते. परंतु शासन स्तरावर दखल घेत नसल्याने उद्ध्वेगाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने नागपूर विभाग सचिव तथा आदर्श शिक्षक गजानन कुरवाडे व विभाग पदाधिकारी राजकुमार तिरभाने यांच्या पुढाकाराने देण्यात आला. त्याची दखल घेत १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये अल्पशी सुधारणा करून वर्ग ९ व १० मध्ये दोन्ही मिळून ४० विद्यार्थी असेल व ३ किलोमीटरच्या आत कोणतीही माध्यमिक अनुदानित शाळा नसेल तर वर्ग ९ व १० करीता ३ शिक्षक मंजूर करण्याबाबत तसेच वर्ग ९ व १० मध्ये दोन्ही मिळून ३० विद्यार्थी असेल व ५ किलोमीटरच्या आत कोणतीही अनुदानित शाळा नसेल तरीही वर्ग ९ व १० करीता ३ शिक्षक मंजूर करण्याबाबत दि. १८ मार्च २०२६ रोजी सुधारणा केली.
तरीही राज्यातील हजारो शाळा शून्य शिक्षकी होणार असल्याने ११ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून वर्ग ९ व १० करिता दोन्ही मिळून २० विद्यार्थी असल्यास ३ शिक्षक संच मान्यतेत मंजूर करण्याचे आदेश दिल्याने शून्य शिक्षकी अनुदानित माध्यमिक शाळांना अल्पसा दिलासा मिळालेला आहे. परंतु हा निर्णय फक्त एका वर्षाकरिता प्रोत्साहन पर असल्याने पुन्हा प्रत्येक वर्गात २० विद्यार्थी पटसंख्या नसल्यास शाळा शून्य शिक्षकी होण्याची भीती निर्माण झालेली आहे.
१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात तशी दुरुस्ती करून नेहमी करीता हा निर्णय कायम करुन ग्रामीण व शहरी असा भेदभाव न करता सरसकट सर्वांना या निर्णयाचा लाभ देऊन गोरगरिबांचे मुले माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर, सचिव गजानन कुरवाडे, विभाग उपाध्यक्ष बाळनाथ मानकर, नागपूर जिल्हाध्यक्ष योगराज ढेंगे, सचिव पृथ्वीराज चव्हाण, विजय काळे, विनायक देवकर आदींनी केलेली आहे.