spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आदिवासी संस्कृती आणि परंपरा टिकवा तरच आरक्षण वाचेल – डॉ. सुरेशकुमार पंधरे यांचे सातलवाडा येथे आवाहन

– सातलवाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती सोहळा व राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न

भंडारा :- “आदिवासी समाजाची धार्मिक संस्कृती आणि जीवनमान हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. आपली परंपरा आणि चालिरीती इतर धर्मांपेक्षा वेगळ्या आहेत. जर आपली संस्कृती आणि परंपरा टिकली, तरच आपले आरक्षण आणि अस्तित्व सुरक्षित राहील,” असे प्रतिपादन बी.एम.आर.एफ.चे संस्थापक डॉ. सुरेशकुमार पंधरे यांनी केले.

साकोली तालुक्यातील सातलवाडा येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती सप्ताहाचे औचित्य साधून आणि क्रांतीज्योती राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. २७ डिसेंबर रोजी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

‘बोगसांना’ रोखण्यासाठी समाज जागृतीची गरज

आपल्या भाषणात डॉ. पंधरे यांनी ‘बोगस’ आदिवासींच्या घुसखोरीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “आज आदिवासी समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारणाऱ्या बोगस लोकांची संख्या वाढत आहे. हे रोखण्याची जबाबदारी आजच्या सुशिक्षित पिढीवर आहे. बोगसांना रोखण्यासाठी आपल्याच जमातीत लग्नसंबंध जोडणे ही काळाची गरज आहे.”

कौशल्य विकासातून बेरोजगारी दूर करा

समाजातील तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले की, आदिवासी तरुणांकडे उपजत कौशल्य (Skill) भरपूर आहे, मात्र त्याचा वापर उद्योगासाठी होत नाही. यामुळे बेरोजगारी वाढत आहे. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता, संघटनात्मक शक्ती आणि शासकीय योजनांचा पाठपुरावा करून उद्योगधंद्यांकडे वळावे. प्रत्येक घरातून बिरसा मुंडांसारखा क्रांतीकारक योद्धा आणि राणी दुर्गावतींसारख्या प्रेरणादायी महिला निर्माण झाल्या पाहिजेत.

व्यसनमुक्त समाज घडवण्याचे आवाहन करत डॉ. पंधरे यांनी इशारा दिला की, “तुम्ही या जमिनीचे मूळ मालक आहात. जर तुम्ही संघटित झाला नाहीत आणि आपली संस्कृती विसरलात, तर धनदांडगे तुमच्या जमिनी हस्तगत करतील आणि पुन्हा गुलामगिरीची वेळ येईल. ती वेळ येऊ द्यायची नसेल, तर एकीच्या सूत्रात बांधले जा.”

या कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मराज भलावी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवर्धन कुंभरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी. खांदवाये, निवृत्ती उईके, नाजूक उईके, सरपंच मेश्राम, शैलेश गजभिये, पोलीस पाटील रमेश भोंडे, रवी बिसेन, अर्चना इलपाते व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ सयाम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कैलास कन्नहाके यांनी मानले. या सोहळ्यामुळे परिसरात आदिवासी अस्मितेचा जागर पाहायला मिळाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.