spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिहार विधानसभेतील दणदणीत विजयाचा चंद्रपुरात जल्लोष; 

चंद्रपूर :-बिहार विधानसभेत भारतीय जनता पक्ष-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाचा चंद्रपूर शहरात भव्य जल्लोष करण्यात आला. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच, गांधी चौक परिसरात भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली आणि जयघोषांच्या वातावरणात विजय सोहळ्याला सुरुवात झाली.

बिहारमधील २४३ सदस्यांच्या विधानसभेत एनडीएने २०० हून अधिक जागांवर बाजी मारत सत्ता पुन्हा एकदा हस्तगत केली. या विजयाने उत्साही झालेल्या चंद्रपुरातील भाजप कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच गांधी चौकात एकत्र जमून आनंदोत्सव साजरा केला.

या कार्यक्रमाचे नेतृत्व आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी “मोदी सरकार जिंदाबाद”, “एनडीए विजयी भव” अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकले.

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा विकासाला मत देत एनडीएला प्रचंड बहुमत दिले आहे. हा विजय राष्ट्राच्या प्रगतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा पुरावा आहे. बिहारची जनता आणि देशातील सर्व मतदार यांचे मनःपूर्वक आभार.” त्यांनी पुढे सांगितले की, केंद्रातील नेतृत्वाच्या धोरणांवर आणि विकासकामांवरील विश्वासामुळे हा विजय मिळाला असून चंद्रपूरमधील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आनंद दुणावल्याचेही त्यांनी नमूद केले.विजय सोहळा पाहण्यासाठी गांधी चौकात मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलिसांकडून योग्य ते बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण होते.एनडीएच्या या विजयामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा व उत्साह निर्माण झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही अशाच विजयाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला.

Popular Articles